Join us

कठीण परिस्थितीमध्ये हिंमत न हरण्याची प्रेरणा मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 1:39 AM

चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला चांद्रयान मोहिमेतील प्रवास

मुंबई : चांद्रयान मोहिमेत इंधन संपत आले होते, तरी निल आर्मस्ट्राँग हिंमत हरले नाहीत. जिद्दीने आलेल्या संकटावर मात केली़ या मोहिमेतून कठीण परिस्थितीमध्ये हिम्मत न हरण्याची प्रेरणा मिळाली, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

निल आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाउल ठेवले त्याला ५० वर्षे पूर्ण झाली असून, त्या निमित्ताने दोस्ती हाउस, यूएस कॉउसलेट जनरल, मुंबई आणि सोनी बीबीसी अर्थ यांच्या सहकार्याने नेहरू सायन्स सेंटरच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काही चित्रपट दाखविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये १,७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

निल आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवल्याचा प्रसंग पाहून खूप आनंद वाटला. अपोलो मिशन १० वेळा अपयशी होऊन जिद्द सोडली नाही, ११व्या वेळेस ती मोहीम यशस्वी झाली. चांद्रयान मोहिमेस ८ दिवस लागले. सहाव्या दिवशी जेव्हा चंद्रावर पाऊल ठेवले, ते पाहून खूप अभिमान वाटला, असे ग्रीन एकर्स मधील विद्यार्थी भाव्यान गबिजा याने सांगितले, तर या चित्रपटात ग्रह आणि विमाने पाहायला मिळाली. काही प्रसंगामध्ये भीती वाटली. अनेक दृश्यांनंतर विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजविल्या, हा चित्रपट पाहून खूप आनंद वाटला, असे एसव्हीएस शाळेतील अक्षिता मंचे या विद्यार्थिनीने सांगितले.

चंद्रावर जाणे, तिथला प्रसंग टिपणे हा वेगळा अनुभव चित्रपटातून पाहायला मिळाला. त्यांनी आठ दिवस या मोहिमेसाठी दिले. ते कसे व्यतीत केले, आठ दिवसांनंतर परत आले़ ते दृश्य संस्मरणीय होता, असे साक्षी ठाकूर या विद्यार्थिनीने सांगितले, तर या चित्रपटाच्या माध्यमातून खूप माहिती मिळाली. चांद्रयान मोहिमेत इंधन संपत झाले होते, तरी निल आर्मस्ट्राँग हिंमत हरले नाही. कठीण परिस्थितीमध्ये हिंमत हरायची नाही, याची शिकवण मिळाली. चांद्रयान मोहिमेतील निल आर्मस्ट्राँग यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. हा प्रवास पाहून भविष्यात त्याच्या प्रमाणे अंतराळवीर होण्याची इच्छा आहे, असे मत स्वामी विवेकानंद विद्यालयातील युक्ता हुले या विद्यार्थिनीने व्यक्त केले.