मुंबई : देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंड या राज्यात सरकार असे प्रकल्प सुरू करणार आहे ज्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, परंतु कसलेही प्रदूषण होणार नाही, अशी ग्वाही उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मंगळवारी दिली. उत्तराखंडमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढविण्याच्या हेतूने मुख्यमंत्री धामी सोमवारी मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत रोड शोदेखील केला.
लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनीही मुख्यमंत्री धामी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र तसेच उत्तराखंड यांच्यातील विविध क्षेत्रांमधील सहयोगाबाबत चर्चा केली. डॉ. दर्डा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री धामी म्हणाले की, उत्तराखंडमध्ये शून्य प्रदूषण करणारे उद्योग सुरू केले जातील. यातून युवकांना नोकऱ्या मिळतील. यावेळी धामी डॉ. दर्डा यांना म्हणाले की, उत्तराखंडमध्ये राजकीय स्थैर्य आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम आहे. राज्यात प्रदूषण नाही. त्यामुळे राज्यात कोणताही उद्योग सुरू करण्यात अडचणी येणार नाहीत.
१.२४ लाख कोटींचे करारपुष्करसिंह धामी म्हणाले की, आतापर्यंत देश-विदेशात झालेल्या रोड शोमध्ये उत्तराखंडमध्ये गुंतवणुकीचे १.२४ लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राज्यात ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ उद्योजकांसाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. याशिवाय गुंतवणूकदारांसाठी नवे धोरण तयार केले आहे. त्यामुळे राज्यात औद्योगिक प्रगती वेगाने झाली आहे.