रेल्वे पुलावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
By admin | Published: June 26, 2017 01:54 AM2017-06-26T01:54:57+5:302017-06-26T01:54:57+5:30
दादर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांवर मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे पाहायला मिळत आहे. फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना ये-जा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांवर मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे पाहायला मिळत आहे. फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना ये-जा करण्यास अडथळा होत असून, प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हे फेरीवाले रेल्वे पुलांच्या दोन्ही बाजूने ठाण मांडत बसत असल्यामुळे, प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करत, वाट काढत प्लॅटफॉर्मवर पोहोचावे लागत आहे.
दादर रेल्वे पुलावर फेरीवाले दररोज बसलेले असतात, त्यावर रेल्वे अथवा पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याची तक्रार प्रवाशी करत आहेत. रेल्वे सुरक्षा बलाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नायर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, दादर रेल्वे स्थानकावरील रेल्वे पुलांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असल्याची तक्रार आलेली नाही, परंतु रेल्वेचे अधिकारी स्थानक आणि रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या पादचारी पुलांची पाहणी करून फेरीवाल्यांवर कारवाई करतील. दरम्यान, दादर स्थानकावरील पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात. याबाबत रेल्वे विभागाकडे विचारणा केली असता, तो पादचारी पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येतो, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.