मुंबई - गेल्या अनेक वर्षापासून मुंबईचा इतिहास सांगणाऱ्या शिवडी किल्ल्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न रखडला होता. या किल्ल्याच्या दुर्लक्षामुळे पर्यटनापासून हे किल्ले वंचित राहिले. धक्कादायक बाब म्हणजे, अतिक्रमणांच्या विळख्यामुळे या किल्ल्यांसोबत येथील इतिहासही नामशेष होईल की काय? अशी भीती निर्माण झाली होती. मात्र मुंबई शहर जिल्हा नियोजन बैठकीत शिवडी किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
अतिक्रमण हटवण्यासाठी गठीत केलेल्या समितीत जिल्हाधिकारी, मुंबई मनपा अति. आयुक्त, पुरातत्व खाते, तसेच पोलीस उपायुक्त यांचा समावेश असेल. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हेदेखील उपस्थित होते. शिवडी, वरळी किल्ल्याभोवती अतिक्रमणांचा विळखा इतका व्यापक आहे की, कोणतीही व्यक्ती सरळ मार्गाने किल्ल्यात शिरूच शकत नाही. किल्ल्यांतर्गत दोन ते तीन मजली घरे उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात ३ महिन्यांची कैद आणि पाच हजार रुपये दंडाची पाटी शासनाने लावलेली आहे.
शिवडी किल्लाराज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेला हा शिवडी किल्ला ग्रेड वन हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून नोंदवण्यात आला आहे. मुंबई फोर्ट सर्किट प्रोजेक्टअंतर्गत या किल्ल्याच्या पुनर्स्थापनेचे पहिल्या टप्प्यातील प्रयत्न सुरू आहेत. स्थलांतरित पक्षी, विशेषतः फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्वागत करणारा दलदल प्रदेश या किल्ल्याला लागून आहे. त्यामुळे हा किल्ला पक्षी निरीक्षणासाठी उत्तम मानला जातो.