मेथीच्या शेतीच्या निमित्ताने वर्सोवा किनाऱ्यावर अतिक्रमण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 10:13 AM2023-07-02T10:13:59+5:302023-07-02T10:14:06+5:30
चौघांविरोधात गुन्हा दाखल; आरोपी सात बंगला परिसरातील
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : वर्सोवा सागर कुटीर परिसरात असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर मेथीची शेती करण्याच्या निमित्ताने अतिक्रमण केले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयात २०२१ मध्ये दाखल जनहित याचिकेच्या आदेशानंतर अंधेरी तहसीलदार कार्यालयाकडून वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर वीरेंद्र यादव, घुंगरू यादव, पवन गौड आणि राममुरत यादव, तसेच अन्य अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी सात बंगला परिसरातील रहिवासी असून, गेली अनेक वर्षे ते हा प्रकार करीत असल्याचे प्राथमिक तपासांत उघड झाले आहे.
सागर कुटीर या सीआरझेड (किनारपट्टी नियमन क्षेत्र) परिसरात काही जणांनी अतिक्रमण करीत समुद्रकिनाऱ्यावर मेथी लागवड करून वाफे तयार केले. तसेच या ठिकाणी वाळूमध्ये विहीरसदृश खोल खड्डे खोदले आहेत जी बाब नागरिकांच्या जिवाला धोकादायक होती. इतकेच नव्हे, तर या ठिकाणी कच्च्या प्लास्टिक आणि बांबूच्या झोपड्या बांधून समुद्रकिनाऱ्याचे नुकसान केले होते. या विरोधात स्थानिक आमदारांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
६ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार, अंधेरी तहसील कार्यालयाकडून या बेकायदा मेथीच्या शेती जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेने पोलिसांच्या मदतीने केली. या आरोपींनी मेथीच्या शेतीच्या नावाखाली वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर अतिक्रमण करून ते बळकविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण हाती घेतल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे अन्य अधिकारी म्हणाला.