बांधकामे तोडलेल्या जागी पुन्हा अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:22 AM2018-08-30T05:22:13+5:302018-08-30T05:23:10+5:30
बोरीवलीतील प्रकार : पालिकेचे कारवाईचे आश्वासन
गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : अनधिकृत बांधकामाची तक्रार करुन त्यावर पालिकेकडून कारवाई करून घ्यायची. त्यानंतर त्याच जागेवर स्वत: अतिक्रमण करुन ती घरे लाखो रुपयांना विकायची. ही कार्यपद्धती करत पालिकेची दिशाभुल करण्याचा प्रकार बोरिवलीमध्ये उघडकीस आला आहे. यावर कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेच्या आर-मध्य विभागाकडून सांगण्यात आले.
बोरिवलीच्या साईबाबा नगरमध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर घरे बांधून त्याची विक्री गुंडासिंग ठाकुर हा कंत्राटदार करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार ठाकुर स्वत:च पालिकेला देतो. त्यांनतर पालिकेने त्या कामावर तोडक कारवाई केली की पुन्हा तो त्याठिकाणी घरे बांधून त्यांची विक्री करतो. प्रत्येक घर हे जवळपास १० ते १५ लाखांना विकले जात असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ठाकुर पालिकेचीच दिशाभूल करत आहेत. या घरांना वीज तसेच पाण्याचे कनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे अशी घरे विकत घेत असलेल्या व्यक्तींची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत पालिकेच्या आर-मध्य विभागाला विचारले असता त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
बांधकामाशी
संबंध नाही
मी पालिकेला तक्रार करून कोणालाही बेघर का करू? तसेच याठिकाणी करण्यात आलेल्या बांधकामाशी माझा काहीच संबंध नाही.
- गुंडासिंग ठाकुर, कंत्राटदार
जागा मोकळी करून सुरक्षा भिंत बांधणार
आम्ही याप्रकरणी संबंधित व्यक्तीला नोटीस बजावली आहे. त्यानुसार ही जागा मोकळी करून त्याच्या चारही बाजूने सुरक्षा भिंत बांधली जाणार आहे. तसेच अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे.
- रमाकांत बिराजदार, सहाय्यक आयुक्त, आर-मध्य विभाग, महापालिका