बेस्ट अपघातांसाठी अतिक्रमण जबाबदार
By admin | Published: January 9, 2016 02:33 AM2016-01-09T02:33:08+5:302016-01-09T02:33:08+5:30
बेस्ट उपक्रमाच्या वाहनांचे अपघात वाढण्यास मुंबईच्या रस्त्यावरील अतिक्रमण जबाबदार आहे़ मात्र ही अतिक्रमणे हटविण्याचे
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या वाहनांचे अपघात वाढण्यास मुंबईच्या रस्त्यावरील अतिक्रमण जबाबदार आहे़ मात्र ही अतिक्रमणे हटविण्याचे अधिकार बेस्टकडे नाहीत, असे स्पष्ट करीत महाव्यवस्थापकांनी अप्रत्यक्षपणे वाढत्या अपघातांसाठी महापालिकेकडे बोट दाखविले आहे़ ही अतिक्रमणे हटविण्यासाठी आगार व्यवस्थापकांना आता पालिका आणि पोलिसांशी चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे़
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच बेस्टच्या वाहनांमुळे चार अपघात झाले आहेत़ गेल्या वर्षभरात बेस्ट उपक्रमाच्या वाहनांनी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी नाराजी काँग्रेसचे रवी राजा यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे व्यक्त केली़ अपघात वाढण्याचे नेमके कारण काय, याचा शोध घेऊन त्यांना चांगले प्रशिक्षण द्या, असा सल्लाही त्यांनी दिला़ आगारांमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा नाहीत़ या गैरसोयीचा परिणाम त्यांच्यावर होतो. मन स्थिर नसल्यास अपघात होणारच, असे मत बेस्ट समिती सदस्यांनी व्यक्त केले़ तर वाहनचालकांवर नजर ठेवा, यासाठी भरारी पथक नेमण्यात यावे, वाहने बेदरकार चालविण्यामागे काय कारण आहे, याचा शोध घ्यावा, अशी सूचना काहींनी केली़ (प्रतिनिधी)