अतिक्रमणे हटविली; गळतीही रोखली, प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने कसली कंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:17 PM2023-06-07T12:17:57+5:302023-06-07T12:19:03+5:30
मे महिन्यात सर्वसामान्यांसाठी खुले केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या अभियांत्रिकी विभागाने मेमध्ये विविध महत्त्वाच्या स्थानकांवर रोडवरील ब्रिज, पादचारी पूल बांधणे, विविध सुरक्षा उपाय हाती घेणे यांसह विविध पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत. प्रवाशांच्या सुविधांमध्ये, मध्य रेल्वेने विविध ठिकाणी फूट ओव्हर ब्रिज मजबूत केले आहेत आणि ते मे महिन्यात सर्वसामान्यांसाठी खुले केले आहेत.
ठाणे येथील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या मोठ्या दुरुस्तीचे काम तसेच फलाट क्र.९ / १०च्या नोझिंग अँगल आणि तुटलेल्या पायऱ्यांच्या फरशा काढून पादचारी पुलाच्या जिन्याच्या मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आल्याने मोठ्या संख्येने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने कल्याण स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील प्लॅटफॉर्म क्र.६ / ७चे जुन्या पादचारी पुलासह जिन्यापासून गंजलेले स्ट्रिंगर, बिघडलेले पुढील बाजूचे कोन, तुटलेल्या पायऱ्यांच्या फरशा, गळती असलेले छप्पर इत्यादी दुरुस्त करण्यात येऊन प्रवाशांच्या वापरासाठी सुरू करण्यात आले.
वडाळारोड स्थानकांवर दोन स्पॅनसह ४०.१५ मीटर लांबीचा नवीन ६ मीटर फूट रुंद ओव्हर ब्रिज मे महिन्यांत खुला केला. नेरळ स्टेशनवर तीन पायऱ्या असलेला आणखी एक पादचारी पूल १ मे २०२२ रोजी खुला करण्यात आला.
१२० झोपड्या जमीनदोस्त
मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने ३० मे रोजी विद्याविहार पलीकडील रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी ९९.३४ मीटर लांबीच्या ट्रॅकवर सर्वात लांब ओपन वेब गर्डर यशस्वीपणे लाँच केले. मे महिन्यात भिवंडी आणि खारबाव विभागादरम्यान ५६ किमी ते ५७ किमी येथील १२० अतिक्रमित झोपड्या पाडल्या. मे महिन्यात ५८३ किमी रूळ आणि १२७ किमी वेल्डची चाचणी पूर्ण झाली. अशाप्रकारे विविध सुविधा देणारा महिना ठरला.