अखेर १४ वर्षांनंतर ‘बेस्ट’ जागा ताब्यात
By admin | Published: March 4, 2016 02:11 AM2016-03-04T02:11:09+5:302016-03-04T02:11:09+5:30
गोरेगाव पूर्व बस स्थानकासाठी आरक्षित जागेवर गेली १४ वर्षे वसलेला गुरांचा बाजार उठवून हा भूखंड अखेर बेस्ट उपक्रमाच्या ताब्यात आला आहे़
मुंबई : गोरेगाव पूर्व बस स्थानकासाठी आरक्षित जागेवर गेली १४ वर्षे वसलेला गुरांचा बाजार उठवून हा भूखंड अखेर बेस्ट उपक्रमाच्या ताब्यात आला आहे़ यामुळे जागेअभावी रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या बसगाड्यांचा प्रश्न सुटणार आहे़
गोरेगाव पूर्व स्थानकाबाहेर असलेली ८ हजार चौ़मी़ जागा
बस स्थानकासाठी राखीव आहे़
परंतु या जागेवर गुरांचा बाजार चालविला जात होता़ २००६मध्ये मुंबईत गुरांचा बाजार बंद करण्याचा कायदा आला़ मात्र गुरांच्या व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे हा बाजार उठविणे बेस्ट उपक्रमासाठी कठीण होऊन बसले होते़ गुरांच्या व्यापाऱ्यांनीही सत्र न्यायालय, उच्च न्यायालय अशी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली़
अखेर १ फेब्रुवारी २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या व्यापाऱ्यांना त्या जागेवरून हलविण्याचे आदेश दिले़
त्यानुसार जिल्हाधिकारी, कॅटल मार्केट विभाग, आरे कॉलनी, बेस्ट प्रशासन व महापालिकेने या बाजारात घुसखोरी केलेल्या २० व्यापाऱ्यांवर कारवाई केली़ ही जागा ताब्यात आल्यामुळे बस रस्त्यावर उभी करून वाहतूककोंडी करणाऱ्या बसगाड्यांचा प्रश्न सुटला आहे़ (प्रतिनिधी)