मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा देणारी हार्बर लोकलची अंधेरी-गोरेगाव चाचणी अखेर मंगळवारी यशस्वीपणे पार पडली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याने फेब्रुवारीच्या अखेरीस हार्बर लोकल गोरेगावपर्यंत धावणार असून याचा फायदा लाखो हार्बर प्रवाशांना होणार आहे.मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट २ अंतर्गत गोरेगावपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. नव्याने काम करण्यात आलेल्या रुळांवर अप आणि डाऊन मार्गावर ताशी १०० किमी या वेगाने लोकलचाचणी यशस्वीपणे पार पडल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चाचणी मंजूर अहवाल पश्चिम रेल्वेला प्राप्त झाल्यानंतर पश्चिम रेल्वे अधिकृतपणे तारखेची घोषणा करणार आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ही सेवा सुरु होण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. गोरेगाव हार्बर मार्ग सुरु झाल्यास दादर आणि अंधेरी स्थानकातील गर्दी विभागली जाणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून थेट गोरेगाव पर्यंत हार्बर लोकल धावणार आहे. त्याचबरोबर अंधेरी हार्बर मार्गावरील लोकल देखील गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.
फेब्रुवारीच्या अखेरीस हार्बर गोरेगावपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:43 AM