Join us

उड्डाणपुलाची साडेसाती संपेना!

By admin | Published: March 11, 2017 3:01 AM

चिंचपोकळी उड्डाणपुलावरील पेव्हरब्लॉक उखडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र शुक्रवारी निदर्शनास आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून उड्डाणपुलावर

मुंबई : चिंचपोकळी उड्डाणपुलावरील पेव्हरब्लॉक उखडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र शुक्रवारी निदर्शनास आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून उड्डाणपुलावर डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरत असतानाही प्रशासनाकडून उड्डाणपुलाच्या देखरेखीकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल म्हणजे अपघाताला निमंत्रण ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.चिंचपोकळी उड्डाणपुलानजीकच्या भायखळा उड्डाणपुलावर काहीच दिवसांपूर्वी डांबरीकरण झाले आहे. तर करी रोड उड्डाणपुलाचीही डागडुजी सुरू आहे. याउलट चिंचपोकळी उड्डाणपुलावरील रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, यासाठी वारंवार मागणी होऊनही दुर्लक्ष होताना दिसत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी संदीप परब यांनी व्यक्त केली आहे. परब म्हणाले की, निवडणुकांदरम्यानही लोकप्रतिनिधींनी हा रस्ता द्रुतगती मार्गाप्रमाणे करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर डांबरीकरणाचा मुद्दा आणि लोकप्रतिनिधी दोघेही अदृश्य झाल्याचे दिसत आहेत.उड्डाणपुलाची सद्यपरिस्थिती पाहता नागरिकांनी खड्ड्यातून प्रवास करून आपला जीव गमवावा का? अशा अनेक तऱ्हेचे प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहेत. त्यामुळे एखाद्या वाहनचालकाचाना नाहक बळी जाण्याआधी नवनिर्वाचित नगरसेवकांनी याकडे लक्ष देऊन तत्काळ प्रश्न मार्गी काढण्याची मागणीही चिंचपोकळीकरांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)