- सीमा महांगडे मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीचा भूगोलाचा शेवटचा पेपर शिक्षण विभागाकडून रद्द करण्यात आला होता. मात्र त्याची गुणपद्धती कशी असेल? याबाबत स्पष्टता नव्हती. अखेर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचा निर्णय जाहीर केला असून, इतर विषयांच्या लेखी परीक्षांच्या गुणांच्या सरासरीइतके गुण भूगोल विषयाला देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
भूगोलाच्या रद्द झालेल्या पेपरची गुणपद्धती कशी असावी, यासाठी मंडळाकडून विहित कार्यपद्धती वापरण्यात आली आहे. मंडळाने तयार केलेला प्रस्ताव हा शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्याला शासनाची मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट करीत आता या गुणपद्धतीनुसार भूगोलाचे गुण देण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले. या गुणपद्धतीसाठी केवळ विद्यार्थ्यांनी दिलेल्या लेखी पेपरचेच गुण ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रेड झोनमध्ये पेपर तपासणी अवघडच
राज्याच्या अनेक भागांत रेड झोन असल्याने अशा ठिकाणी पेपर तपासणी अवघड असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.रेड झोनमधील शिक्षकांकडूनही काही ठिकाणी उत्तरपत्रिका तपासणी कशी करायची? वाहतुकीचे काय? असे प्रश्न उपस्थित होत असल्याने निकालाबाबत काही तज्ज्ञ आणि अधिकारी अनिश्चितता व्यक्त करीत आहेत.
लवकर निकालासाठी प्रयत्नशील
दहावी, बारावीच्या निकालासंबंधी काहीच माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हे निकाल शक्य तितक्या लवकर जाहीर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.