Join us

अखेर मान्सूनने मुंबईच्या मैदानावर शतक ठोकलेच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 4:38 PM

गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत १०१ मिमी पावसाची नोंद

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरावर रुसलेल्या वरुण राजाने अखेर सोमवारी रात्री ९ ते १२ या वेळेत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईसह पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरातील काही भागात दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि सुरु झालेल्या पावसामुळे मान्सून आपली सुरुवातीची कसर भरून काढतो की काय? असे चित्र निर्माण झाले असतानाच सोमवारी रात्री १२ नंतर सर्वत्र पावसाचा जोर ओसरला. मात्र तरिही सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेत १०१ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाल्याने अखेर दाखल झाल्यानंतर अनेक दिवसांनी मान्सूनने मुंबईत शंभरी गाठल्याचे चित्र होते. दरम्यान, जून २०२० मध्ये महाराष्ट्रात मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. यामध्ये औरंगाबाद, बीड, जालना, लातूर तर अहमदनगरसह सोलापूरचा समावेश आहे.  

सोमवारी रात्री ९ ते रात्री १२ या वेळेत पडलेल्या पावसामुळे हिंदमाता, वडाळा, दादर टीटी, महालक्ष्मी, भायखळा, वरळी येथील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. मनुष्यबळ आणि मॅनहोलची झाकणे उघडून येथे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. पावसामुळे पडझड सुरुच असून, १३ ठिकाणी झाडे पडली. १४ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. सुदैवाने यात हानी झाली नाही. मंगळवारपर्यंत पडलेल्या पावसानंतर  मुंबईतल्या एकूण पावसाची सरासरी १३.१० टक्के झाली असून, मुंबई शहर आणि उपनगरात २४ तासांत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

टॅग्स :मानसून स्पेशलमुंबईपाऊसमहाराष्ट्र