Join us

मुंबई विद्यापीठाची परीक्षा संपेना! निकाल न मिळाल्याने हजारो विद्यार्थी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:09 AM

मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला सर्व ४७७ निकाल जाहीर केले. पण अजूनही तब्बल ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी हे निकालांच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला सर्व ४७७ निकाल जाहीर केले. पण अजूनही तब्बल ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी हे निकालांच्या प्रतीक्षेत आहेत. आॅक्टोबर महिना सुरू झाला तरी विद्यार्थ्यांच्या हाती निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करणे ही विद्यापीठाची परीक्षा आहे. पण दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानाचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.मुंबई विद्यापीठातील हजारो विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकाल लावण्यास विद्यापीठाला उशीर झाला आहे. त्यातच निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याचा नवीन गोंधळ समोर आला. उत्तरपत्रिकांवरील कोडमुळे गोंधळ झाल्याचे विद्यापीठाच्या लक्षात आल्यानंतर उत्तरपत्रिकांचा शोध सुरू झाला. पण त्यातही विद्यापीठाला १ हजार ६०० उत्तरपत्रिकांचा शोध लागलेला नाही.१ हजार ६०० विद्यार्थ्यांना आता सरासरी गुण देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. पण त्याची नियमावली अजूनही ठरलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर अधिक ताण आहे. मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिलमध्ये जाहीर केला. त्यानंतर आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी प्र्रक्रिया सुरू करण्यात आली. निविदा प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे पुढे सर्वच प्रक्रिया उशिरा झाली. जूनमध्ये उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू झाली. लाखो उत्तरपत्रिका तपासताना अनेक प्रश्न प्राध्यापकांसमोर उभे राहिले. त्यातून मार्ग काढून उत्तरपत्रिका तपासणी केल्याने पुनर्मूल्यांकनाच्या उत्तरपत्रिकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठविद्यार्थी