Join us  

रजा संपवा; दोन वर्षांनंतरही मिळेनात पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 3:22 PM

आधी कोरोना आणि नंतर संपाच्या फटक्यामुळे एसटीचे बरेचसे कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले होते. त्यामुळेच की काय, ते त्यांना मिळणाऱ्या एकूण रजेपैकी जवळपास ५० टक्के रजा देऊन त्या मोबदल्यात आर्थिक लाभ पदरात पाडून घेत असतात. दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना रजेचे पैसे मिळालेले नाहीत.

मुंबई : सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना भरपूर सवलती आणि रजा मिळतात. मात्र एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्या तरी सवलती कमी मिळतात. त्यांचा पगारही कमी असल्याची ओरड नेहमी कानावर पडते. आधी कोरोना आणि नंतर संपाच्या फटक्यामुळे एसटीचे बरेचसे कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले होते. त्यामुळेच की काय, ते त्यांना मिळणाऱ्या एकूण रजेपैकी जवळपास ५० टक्के रजा देऊन त्या मोबदल्यात आर्थिक लाभ पदरात पाडून घेत असतात. दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना रजेचे पैसे मिळालेले नाहीत.

‘तो’ कर्मचाऱ्यांचा अधिकारप्रशासकीय नियमांचे पालन करून कर्मचारी त्यांच्या मर्जीप्रमाणे रजा विकू शकतात किंवा सरेंडर करू शकतात. त्यासाठी कर्मचाऱ्यावर कुठलाही दबाव अथवा दडपण नसते. तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याची मुभा असल्याचे या विषयाच्या संबंधाने बोलताना एसटीचे अधिकारी म्हणतात.

किती रजांचे पैसे मिळतात?कर्मचारी त्यांच्या एकूण रजांपैकी प्रशासकीय नियमांचं पालन करून वर्षाला ४० पैकी २० रजा विकू शकतात. दुसऱ्या एका नियमानुसार कर्मचारी १५ दिवस सुट्या घेऊन ३० रजा विकू शकतात, असेही अधिकारी सांगतात. त्यांना जेवढ्या रजा विकल्या त्याचे त्यांच्या पगाराच्या हिशेबाप्रमाणे पैसे मिळतात.

खरेतर सेवानिवृत्तीच्या दिवशीच रजेचे पैसे, भविष्य निर्वाह निधी व ग्रॅज्युईटीची रक्कम देण्याची तरतूद आहे. मात्र तीन तीन वर्षे या रकमा मिळत नाहीत. सेवेतील कर्मचाऱ्यांच्यादेखील रजारोखीकरण कार्यशाळेचा अतिकालिक भत्ता बंद केला आहे. चार वर्षे मेडिकल बिले रखडली आहेत.  प्रलंबित डीए एचआरए वेतनवाढीच्या दराचे १२०० कोटी बाकी आहेत. तेव्हा सरकारने तातडीने मदत करून प्रलंबित देयके देण्याबाबत मदत करणे आवश्यक आहे.- संदीप शिंदे, अध्यक्ष ,महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

पैशाचा हिशेब वेगवेगळासर्वजणांनी सारख्या रजा विकल्या म्हणजे सर्वांना सारखीच रक्कम (परतावा) मिळेल, असे नाही. कुणाचा पगार ३० हजार असेल तर कुणाचा ४० हजार असेल. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला एका दिवसाला किती रक्कम येईल, या हिशेबाने तितक्या दिवसाच्या रजेचे पैसे परत मिळेल.

एसटीचालक, वाहकांना वर्षाला ४० रजाएसटीच्या चालक आणि वाहकांना वर्षभरात प्रत्येकी ४० अर्जित रजा मिळतात आणि दहा सणावारांच्या सुट्या असतात. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मात्र वर्षाला प्रत्येकी ३० रजा मिळतात.

टॅग्स :बसचालकमहाराष्ट्र सरकार