मुंबई - आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आपण २२ मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क वरून बोलू, असे सांगत राज ठाकरे यांनी एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली. दरवर्षी दसऱ्याला उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो. तर, गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते. त्यामुळे, आता, मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार, पुढील दिशा काय ठरवणार हे ऐकण्यासाठी महाराष्ट्राची जनता उत्सुक आहे. तत्पूर्वी राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसेकडून दररोज एक टीझर रिलीज करण्यात येत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठी. राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली तयारी, त्यांची पुढची दिशा स्पष्ट करणारी आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महापालिका निवडणूक सोपी नाही. कारण, अनेक आमदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असे दिसत आहे. हे पाहता उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारांचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे यांना भाजपकडून पडद्याआड सपोर्ट केला जाईल, असं सांगण्यात येत आहे. तर, मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी आपण पुढील काळात सत्तेत असू, असेही पदााधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यामुळे, यंदाचा मनसेचा पाडवा मेळावा लक्षवेधी ठरणार आहे.
मनसेनं आज पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये, मनसेनं मशिदींवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आलाय. तर, बाळासाहेबांचं स्वप्न राज ठाकरेंनी पूर्ण केल्याचंही या व्हिडिओत म्हटलंय. मशिदींची मुजोरी संपवावी... असे म्हणत मनसेचा हा टीझर रिलीज झालाय.
यापूर्वीही दोन व्हिडिओ शेअर
गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरे कोणत्या दिशेने गुढी उभारणार? हा राज्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते यांना पडलेला प्रश्न आहे. आज साचलेले राजकारण दिसत आहे. मात्र त्याआधी मनसेने राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओद्वारे ट्रेलर शेअर केला होता. यामध्ये गेले दोन-अडीच वर्ष महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ना, महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही, असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. आणि हे जर समजा तुम्हाला वाटत असेल की, हे खरं राजकारण, तर हे राजकारण नव्हे, असं राज ठाकरेंचे वाक्य या व्हिडिओद्वारे शेअर केले आहेत. तर, त्याअगोदरही एक व्हिडिओ शेअर करत, हिंदू, मराठी, महाराष्ट्र आणि राज ठाकरे या नावांचा उल्लेख त्या व्हिडिओत करण्यात आला होता.