सागरी क्षेत्र संरक्षित नसल्याने प्रजाती लुप्त होण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 01:48 PM2020-08-16T13:48:39+5:302020-08-16T13:58:21+5:30
लुप्त होणा-या माशांच्या प्रजातींना संरक्षण मिळाले पाहिजे.
मुंबई : मुंबईसह लगतच्या समुद्र किनारी शार्क व्हेल हे मासे आढळतात. पश्चिम किनारी हे मासे अधिक आढळतात. मात्र आपल्याकडे सागरी संरक्षित क्षेत्र नाही. ३ टक्के देखील हे प्रमाण नाही. त्यामुळे माशांच्या प्रजातींना धोका पोहचत आहे. परिणामी माशांच्या प्रजातींना विशेषत: लुप्त होणा-या माशांच्या प्रजातींना संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे. कुलाबा येथे काही दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेला शार्क व्हेल प्रजातीचा मासा हा माशांमधला सर्वात मोठा मासा म्हणून ओळखला जातो. हा मासा संरक्षित प्रजातीमध्ये मोडतो. वाघा एवढे संरक्षण त्याला आहे. मात्र काही वेळेस त्यालाही हानी पोहचत आहे.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक भूषण भोईर यांच्याशी या पार्श्वभूमीवर अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सुरुवातीला शार्क व्हेल हा मासा जाळ्यात अडकला आणि नुकसान झाले तर भरपाई मिळत नव्हती. त्यामुळे असे मासे किनारी आणले जात होते. किंवा येत होते. मात्र आता संरक्षित प्रजातीमधील मासा जाळ्यात अडकला आणि त्याला सोडविताना जाळ्याचे नुकसान झाले तर भरपाई मिळते. केवळ यासाठी व्हिडीओ रेकॉर्ड करावा लागतो. अशा व्यक्तीचा गौरवही केला जातो. शेडयुल वनमध्ये हा मासा येतो. काही वर्षापूर्वी सातपाटी येथे देखील ह्या संरक्षित प्रजातीमधला मासा चुकून जाळ्यात आला. त्यावेळी माशाला जाळ्यातून मुक्त करताना झालेल्या नुकसानीचा परतावा मिळत नसल्याने तब्बल बारा तास बोटिशी झगडून सुटण्याचा प्रयत्न करत असलेला मासा किना-यावर येऊन तेथील पाण्यात बारा तास जिवंत तडफडत मेला.
शार्क व्हेल हा मासा शार्क माशांच्या प्रजातीमधला जरी असला तरी तो मोठ्या माशांची शिकार करत नाही. हा मासा समुद्रात उगवणा-या सूक्ष्म शैवलांवर आणि असंख्य लहान मोठया माशांची अंडी ते खातात. हे मासे जास्तीत जास्त ४० फूट पर्यंत वाढतात. अवाढव्य आकार असून स्वभावाने शांत असतात. व्हेल आणि शार्क व्हेल यांच्यात काही फरक असेल तर तो म्हणजे रक्ताचा शार्क व्हेल हे व्हेल नसून मासे आहेत. म्हणजेच थंड रक्ताचे प्राणी आहेत त्यांची तुलना व्हेल प्राण्यांशी केल्यास व्हेल हे समुद्री सस्तन प्राणी आहेत जे पिल्लांना जन्म देतात व त्यांना दूध पाजतात हे मासे प्रजनन सक्षम होण्यासाठी तब्बल ३० वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक काळ लागतो हे मासे वर्षभरात तब्बल ८० हजार किलोमीटर प्रवास करतात हा प्रवास करताना हे मासे विविध ठिकाणी चरतात. एका ठिकाणी खाल्लेले अन्न दुस-या ठिकाणी विष्ठेच्या रुपात जेव्हा ते टाकतात तेव्हा त्यांच्या विष्ठेतून अशा ठिकाणी पोषकद्रव्ये उपलब्ध होतात. त्या पोषक द्रव्यांमुळे या ठिकाणी नवीन शैवलांची निर्मिती होते. त्यांच्या ह्या प्रवासामुळे एखाद्या पोषक द्रव्ये नसलेल्या ठिकाणी पोषद्रव्ये येतात. समुद्रात पोषक द्रव्यांचा समतोल हे मासे राखतात; ज्यामुळे समुद्र निरोगी राहतो.