पावसाळ्यात आमच्या जीवाला धोका;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:51+5:302021-07-25T04:06:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पावसाळ्यात आमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे आणि तात्पुरती सुविधा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्यात आमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे आणि तात्पुरती सुविधा म्हणून कांदिवली आणि मालाड येथे रिकाम्या असलेल्या पीएपी इमारतीमध्ये आमचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मालाड येथील आंबेडकरनगरमधील रहिवाशांनी केली आहे.
२०१९ साली मालाड, कुरार व्हिलेज, आंबेडकर नगर येथे आलेल्या पुराने आणि कोसळलेल्या भिंतीने तब्बल ३१ नागरिकांचे बळी घेतले होते. आजही येथे परिस्थिती फार काही वेगळी नाही. लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. दर पावसाळ्यात येथील घरे पावसाच्या पाण्याच्या पुराखाली जातात. घरातील साहित्य वाहून जाते. अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून सरकारने आता येथील रहिवाशांच्या पुनर्वसनावर भर द्यावा, या मागणीसाठी रहिवाशांनी आंबेडकर नगर येथेच धरणे धरले आहे.
मुसळधार पावसाने सलग मुंबईला झोडपून काढले. याच मुसळधार पावसामुळे मालाड, कुरार व्हिलेज, आंबेडकर नगरमधील शंभरांहून अधिक घरे पावसाच्या पाण्याच्या पुराखाली होती. पूरग्रस्त नागरिकांनी यंत्रणांची मदत मागितली. मात्र कित्येक काळ उलटल्यानंतरही या नागरिकांच्या मदतीला कोणीच धावून आले नाही, अशी खंत संबंधितांनी व्यक्त केली आहे. येथील १३ हजार नागरिकांचे पुनर्वसन झाले, तर भविष्यात संकट ओढविणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.