मुंबई : उन्हाळ्यात विजेची मागणी वाढेल. त्यावेळेस वीज संच उत्पादनासाठी सज्ज असले पाहिजेत. वारंवार संचात होणारे बिघाड कसे टाळता येईल आणि वीज संच मेरीट आॅर्डर डिस्पॅचमध्ये कसे सुरू राहतील? याबाबत नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले. प्रस्तावित वीज प्रकल्पाचे कामे वेळेत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देतानाच त्यांनी उन्हाळ्यात वीज मागणीत वाढ होत असल्याने पारेषण व वितरण प्रणालीवर ताण पडून होणारे बिघाड कसे कमी करता येईल. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारे देखभाल-दुरुस्तीच्या कामांचे योग्य नियोजन करून वेळेतच पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे २० एप्रिलपासून ऊर्जा विभागाने सज्ज रहावे, असेही नितीन राऊत म्हणाले.
ऊर्जा विभागाने करावयाच्या तयारीच्या अनुषंगान नितीन राऊत यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे विभागाचे प्रधान सचिव तथा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण तसेच महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक तसेच संबंधित सर्व संचालक व अन्य अधिका-यांना सूचना दिल्या. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात रेड ,आॅरेंज व ग्रीन झोनमध्ये जिल्ह्याची वर्गवारी करण्यात आली आहे, त्यानुसार प्रादेशिक स्तरावर वीज विषयक कामांचे नियोजन करावे. प्रश्नांवर वेळीच तोडगा काढावा, अशा सूचना देत तिन्ही कंपन्यांचे एकत्रित आर्थिक नियोजन करून, पारदर्शकता ठेवत, दर दहा दिवसांनी याबाबतचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये व्यवसायिक, औद्योगिक वीज वापर कमी झाल्याने निधी मिळणे बंद झाले आहे. वीज नियामक आयोगाने स्थिर आकार तीन महिन्याकरिता थांबवलेला आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे वीज कंपन्याना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी केंद्राच्या एनटीपीसीकडून बील डिस्काउंटींग, कमीत कमी दरात कर्ज घेत घेऊन आर्थिक परिस्थितिवर मार्ग काढावा, असेही राऊत म्हणाले.--------------------------
ऊर्जामंत्र्यांनी दिल्या सूचना
- कमीत कमी व्याजदर असलेल्या वित्तीय बँकाबाबत तपासणी करा.
- आर्थिक काटकसर आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधून तिन्ही वीज कंपन्यानी कंपनी निहाय तज्ज्ञ व्यक्तींचा स्वतंत्र अ•यासगट तयार करावा.
- फ्रेंचायझीकडून वीज पुरवठा करण्यात येणा-या भिवंडी, मुंब्रा-कळवा, मालेगाव व इतर ठिकाणी पुरवठ्याची सद्यस्थितीचा आढावा घेण्यात यावा.
- महावितरणच्या कॉल सेंटरशी निगडीत तक्रारी त्वरित सोडवा.