मुंबई विमानतळाला ‘ऊर्जा कार्यक्षम युनिट’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:56+5:302021-09-02T04:14:56+5:30
मुंबई : हरित ऊर्जा आणि ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘ऊर्जा कार्यक्षम ...
मुंबई : हरित ऊर्जा आणि ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘ऊर्जा कार्यक्षम युनिट’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीने (सीआयआय) ऊर्जा व्यवस्थापन राष्ट्रीय पुरस्कार (२०२१) नुकतेच जाहीर केले. त्यात मुंबई विमानतळाचा समावेश आहे. पुरस्काराचे यंदाचे २२ वे वर्ष असून, मुंबई विमानतळाने राबविलेले शाश्वत आणि हरित उपक्रम, ऊर्जा बचतीसाठी केलेले प्रयत्न, हरित साखळीचे जतन, कचऱ्याचे व्यवस्थापन, हरितगृह वायू उत्सर्जन आणि हवामान बदलाशी निगडीत उपक्रमांसाठी मुंबई विमानतळाचा ‘ऊर्जा कार्यक्षम युनिट’ म्हणून गौरव करण्यात आला. दि. २४ ते २७ ऑगस्टदरम्यान आभासी माध्यमातून हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
मुंबई विमानतळाने पर्यावरण व्यवस्थापनांतर्गत हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. कार्बन व्यवस्थापन प्रणाली, नूतनीकरणयोग्य ऊर्जेस प्रोत्साहन, सांडपाणी पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन प्रणाली अशा काही योजनांचा त्यात समावेश आहे. कोरोनाकाळात ऊर्जा बचतीसाठी मुंबई विमानतळाने विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच एकूण वापराच्या ३५ टक्के म्हणजेच ३८.५० दशलक्ष युनिट ऊर्जा वाचवता आली. त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन ३१ हजार ५८१ युनिटने कमी झाल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आली.
........
वैशिष्ट्ये काय?
- मुंबई विमानतळ हे भारतातील पहिले आणि एकमेव विमानतळ आहे जे नव्या ‘जीआरआय’ मानकांनुसार शाश्वतता अहवाल प्रकाशित करते.
- विमानतळाकडे ऑर्गेनिक वेस्ट कन्व्हर्टर प्रकल्प, बायोमेकॅनिकल कंपोस्टिंग सिस्टीम आहे. त्याची क्षमता प्रतिदिन १.५ मेट्रिक टन आहे.
- ऑर्गेनिक वेस्ट कन्व्हर्टर प्रकल्पाला हरित ऊर्जा पुरवण्यासाठी ५ किलोवॅट ‘पीक’ पॉवर सौर क्षमता आहे. त्यातून तयार झालेले कंपोस्ट फळबागांसाठी वापरले जाते.