बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूकीलाही ऊर्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 06:03 PM2020-11-13T18:03:16+5:302020-11-13T18:03:45+5:30
Construction sector : शेवटच्या तिमाहीत होणार ६७८७ कोटींची गुंतवणूक
मुंबई : कोरोना संक्रमणामुळे जूलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत बांधकाम क्षेत्रात जेमतेम १७४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. परंतु, गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळत असल्याने अखेरच्या तिमाहीत त्यात घसघशीत ६७८७ कोटींची वाढ होण्याची चिन्हे आहेत. वर्षाअखेरीपर्यंत एकूण गुंतवणूक ३५ हजार ६१४ कोटी रुपयांपर्यंत जाईल. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही गुंतवणूक ८,७०५ कोटींनी कमीच असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. .
जेएलएल या प्रख्यात सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षण अहवालातून ही माहिती हाती आली आहे. गेल्या तिमाहीत कार्यालयींन बांधकामांकडे गुंतवणूकदार सर्वाधिक आकर्षित होताना दिसत आहे. शेवटच्या तिमाहीत एकूण बांधकाम क्षेत्रात २६,७११ कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत १ कोटी ३८ लाख चौर फूट व्यावसायिक मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचे व्यवहार झाले आहेत. येत्या काळात त्यात आणखी वाढ होणार आहे.
सर्वाधिक गुंतवणूक बंगळूरू येथे
मुंबई, बंगळूरू आणि चेन्नई या तीन महानंगरामध्ये ७१ टक्के गुंतवणूक झाली आहे. या ८९९२ कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणूकीपैकी एकट्या बंगळूरूचा वाटा ३३ टक्के आहे. कोरोना संक्रमण देशात दाखल झाल्यानंतर या क्षेत्रातील गुंतवणूक ७१ टक्क्यांनी घसरली होती. तो आकडा २००८ साली झालेल्या गुंतवणूकीएवढा होता. त्यावेळी जगभरात मंदी दाखल झाली होती. मात्र, २०१० साली भारतील गुंतवणूक पुन्हा वाढली होती. त्याप्रमाणेच कोरोना संक्रणकाळात घरसलेली गुंतवणूक इंग्रजी व्ही शेप प्रमाणे भरारी घेईल असे भाकीत त्यात व्यक्त करण्यात आले आहे.