Join us

दहिसरमध्ये साकारणार एनर्जी पार्क आणि माहिती केंद्र; मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली मान्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 7:30 PM

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी अंदाजित १५ कोटींचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे.

ठळक मुद्देअदानी इलेक्ट्रिसिटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी अंदाजित १५ कोटींचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे.

मुंबई-मुंबईचे शेवटचे टोक आणि पालिकेचा २२७ प्रभागांपैकी पहिल्या क्रमांकाचा प्रभाग म्हणून दहिसरची ओळख आहे. दहिसरच्या शिरपेचात आता मानाचा तुरा रोवला जाणार आहे. दहिसरमध्ये  एनर्जी पार्क व माहिती केंद्र साकारणार आहे. केवळ पश्चिम उपनगरवासीयांसाठीच नव्हे तर तमाम मुंबईकरांना या प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती तसेच त्याचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे. याप्रकारचा हा भारतातीलच नव्हे जगातील एक अभिनव ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे

शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ.विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभाग क्रमांक एकच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च होणार नसल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी दिली.

राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे या प्रकल्पाचे काल सादरीकरण करण्यात आले. यावेळी अभिषेक घोसाळकर, अदानीचे सीईओ कंदर्प पटेल, अदानीचे सीईओ कपिल शर्मा,महाव्यवस्थापक दीप्ती पडवळ व महापालिका उद्यान विभागाचे जनार्दन माने उपस्थित होते. दहिसर पश्चिमेकडील शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित एनर्जी पार्क व माहिती केंद्राची मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशंसा करत या प्रकल्पास तात्काळ मान्यता देत लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी एनर्जी पार्क तसेच माहिती केंद्र सुरू करण्याची सूचना देखील केली.

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत प्रकल्प पूर्ण केला जाणारया एनर्जी पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांना वीज निर्मिती तसेच याचा वापर कशा प्रकारे करावा याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी अंदाजित १५ कोटींचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. एनर्जी पार्कमध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तसेच विद्यापीठाचे विद्यार्थी व अभ्यागतांना ऊर्जानिर्मिती प्रसारण आणि सुरक्षा उपायांच्या विविध प्रकाराबद्दल माहिती दिली जाणार आहे. 

विशेष म्हणजे या ठिकाणी अभ्यागतांमार्फत वीज निर्मिती केली जाणार आहे. तेथे तयार केलेल्या मजल्यांवर चालणे, सायकल चालवणे आदीतून वीजनिर्मिती केली जाणार आहे. तसेच केंद्रात थर्मल, इलेक्ट्रिकल, हायड्रो, बायोगॅस, न्यूक्लियर, जिओ थर्मल, वारा व सौर आदी पावर प्लांट प्रदर्शित केले जाणार आहेत.याठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी उपाहार गृहाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. तसेच नागरिकाना ऊर्जा व त्यांचे संवर्धन आणि ऊर्जेचे विविध स्तोत्र याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे अशी माहिती नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी दिली.

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबईदहिसरअदानीवीज