Join us

"टर्फ क्रिकेट कोर्टसाठी तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करा"

By मनोहर कुंभेजकर | Published: July 11, 2024 1:19 PM

माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

मुंबई-बोरिवलीत टर्फ क्रिकेट कोर्ट फोडण्याच्या प्रकरणांची माहिती देण्याबरोबरच क्रिकेटसह इतर खेळ खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या खंडणीखोर आरटीआय कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी, खेळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करणारे पत्र  उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे.

गोपाळ शेट्टी यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, मी अनेक वर्षे  खाजगी व मनपा रिकाम्या जागेवर टर्फ क्रिकेट प्रशिक्षणासारखे उपक्रम सुरु करण्यासाठी प्रयत्न केले होते.महापालिकेचे विकास नियोजन विभागाचे मुख्य अभियंता चितोरे  यांनी टर्फ क्रिकेट खेळ संबंधी परवानगी देण्यासाठी सुलभ नियमावली 2020 मध्ये तयार केली होती.  ज्याची प्रत सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांकडे आहे.  हे सर्व असूनही अनेक आरटीआय कार्यकर्त्याची वैयक्तिक फायद्यासाठी टर्फ क्रिकेट कोर्ट वापराविरोधात तक्रारी सुरूच आहेत आणि महापालिका अधिकारी तसेच अशा तक्रारदारांनाही  महत्त्व देतात.  त्यामुळे बोरिवलीत अनेक टर्फ क्रिकेट कोर्ट बांधले गेले होते,तेही महापालिकेने पाडले.अशा तोडफोडीमुळे टर्फ क्रिकेट कोर्टचे चालक आणि आयोजक धास्तावले जातात आणि मग महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारीही त्यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पैसे वसूल करतात.  परिणामी आर्थिक बोजाचा टर्फ क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवरही विपरीत परिणाम होत असल्याची त्यांनी स्पष्टपणे पत्रात नमूद केले आहे.

 अनेक आरटीआय कार्यकर्ते अशा प्रकरणांमध्ये हजारो नव्हे तर लाखो रुपये टर्फ क्रिकेट चालक/आयोजकांकडून मागणी करतात.  काही चालक व आयोजक अशा लोकांच्या मागण्या पूर्ण करत आहेत, तर काही लोकप्रतिनिधींना या बाबतीत मदतीच्या अपेक्षेने भेटतात.  त्यामुळे अशा बाबींसाठी नियम बनवणे आवश्यक असल्याचे नमूद करून अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आपल्या कडे येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केवळ बोरिवलीतच नव्हे तर संपूर्ण मुंबई शहरात एका टर्फक्रिकेट असलेल्या किती संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे? आणि कारवाई साठी वेळ का वाया घालवत आहात? महानगरपालिकेचे अधिकारी तक्रार करूनही तरुणांना क्रिकेट खेळण्यापासून वंचित ठेवतात.आरटीआय कार्यकर्त्यांची यामागे कोणती भूमिका आहे, याची माहिती मिळाल्यानंतर अशा कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी. अशी मागणीही गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या " खेलो इंडिया" संकल्पनेतून स्फूर्ती घेऊन क्रीडाप्रेमी मुले या क्षेत्राकडे वळत असून येणाऱ्या काळात आपल्या देशाला गौरव प्राप्त करून देणारे खेळाडू यातूनच निर्माण होणार आहेत.परिणामी या विषयी आपण सर्वांनी योग्य लक्ष घालून क्रिकेट टर्फ कोर्टस सर्व क्रिकेट खेळाडूंना उपलब्ध होतील अशी सर्व प्रकारची व्यवस्था केली पाहिजे असे अशी भूमिका त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून व्यक्त केली.

आमदार व खासदारांना प्राप्त निधीतून सर्व शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत टर्फ क्रिकेट तसेच तत्सम खेळांचे कोर्टस उपलब्ध करून देण्यासंदर्भातही शासन नियमावली, परिपत्रक काढून शाळेतील मुलांना निःशुल्क किंवा कमीत कमी खर्चात टर्फ क्रिकेट किंवा अन्य खेळांचा उपयोग केल्यास एक चांगले खेळाचे वातावरण समाजामध्ये निर्माण होईल असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.

टॅग्स :मुंबई