राज ठाकरे यांना ईडीची नोटीस?, ‘राज’कीय दबाव असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 06:55 AM2019-08-19T06:55:24+5:302019-08-19T07:06:35+5:30
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर चौफेर टीका करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविली असून येत्या 22 ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. मात्र, या वृत्ताला मनसेकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला आला नाही. परंतु, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
याचबरोबर, संदीप देशपांडे म्हणाले, 'राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचे जराही आश्चर्य वाटत नाही. सरकार सूडाचे राजकारण करत असून हा दबाव तंत्राचा भाग आहे. आम्ही अशा दबावतंत्राला मुळीच भीक घालत नाही. राज ठाकरे यांच्यावर कारवाई झाल्यास आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू.'
दरम्यान, राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरु केली आहे. भाजपा- सेना विरोधातील सर्व पक्षाच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तसेच, विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांच्याकडून पुन्हा भाजपावर तोफ डागली जाऊ शकते. त्यामुळे त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाचा चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला जात, असल्याचेही म्हटले जात आहे.
काय आहे प्रकरण?
राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी मिळून दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी २००८ साली या प्रकरणी आपले सर्व शेअर्स विकले होते. मात्र, त्यानंतरही राज ठाकरे या कंपनीत सक्रिय असल्याचे सांगत याप्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे.