Sanjay Raut: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. संजय राऊत यांचा मुक्काम १९ सप्टेंबरपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच असणार आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, ईडीने संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच पत्राचाळ प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संजय राऊत यांना जामीन देऊ नये, असे सांगत न्यायालयात आपले उत्तर मांडले आहे.
पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याचे सांगितले जात आहे. १०३९ कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय नेते आहेत. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यास राऊत साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन देऊ नये, असे ईडीने म्हटले.
जामीन अर्जावर पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी
जय राऊत यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांचे बोलावणे आले होते. उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले, तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचेही प्रमुख आहेत. म्हणून मला बोलावले होते. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबाची विचारपूस केली, असे सुनील राऊत यांनी सांगितले होते. तसेच संजय राऊत यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधे पुरवण्याची मुभा न्यायालयाने दिली होती. संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत हे पत्राचाळ विकासाचे काम पाहत होते. त्यांना HDIL मिळालेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १.०६ कोटी रुपये हे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे.