Sanjay Raut: संजय राऊतांना बेल मिळणार की कोठडीतील मुक्काम वाढणार? सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 09:31 AM2022-08-04T09:31:10+5:302022-08-04T09:32:16+5:30
Sanjay Raut: ईडीकडून अटक करण्यात आलेल्या अनिल देशमुख, नवाब मलिकांना अद्यापही जामीन मिळालेला नसून, आज संजय राऊतांना पुन्हा कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.
मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या कोठडीची मुदत आज (०४ ऑगस्ट) संपत असून, संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार आहे. आज होणाऱ्या सुनावणीत संजय राऊत यांना जामीन मंजूर होऊन दिलासा मिळणार की, कोठडीत वाढ होणार, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करून तब्बल ९ तास झाडाझडती घेतली होती. संजय राऊत यांच्या भांडुप येथील बंगल्यात धाड टाकण्यात आली होती. एकीकडे भांडुप येथील निवासस्थानी शोधकार्य सुरू असताना, संजय राऊत यांच्याच दादरमधील गार्डन कोर्ट फ्लॅटवरही छापा टाकण्यात आला होता. तसेच गोरेगाव येथेही छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर तपासाला सहकार्य न करण्याच्या कारणावरून संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. तिथेही सुमारे ७ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सात दिवसाच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडून अमान्य
अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सखोल चौकशीसाठी सात दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. याला संजय राऊत यांच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळत संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी दिली.
दरम्यान, यापूर्वी ईडीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी भुजबळांना २ वर्ष एक महिना आणि २१ दिवस तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर भुजबळांना जामीन मिळाला होता. तर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक करण्यात आली. देशमुख गेल्या ८ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांना अद्यापही जामीन मिळालेला नाही. तीच अवस्था माजी मंत्री नवाब मलिक यांची आहे. मलिक हे सुद्धा ४ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांनाही जामीन मिळाला नाही. त्यामुळे राऊत यांना जामीन मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.