कठोर निर्बंधांची अंमलबजावणी/ प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:06 AM2021-04-06T04:06:24+5:302021-04-06T04:06:24+5:30

- वीरेन शहा, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन ................................... शनिवार, रविवारी दुकान बंद ठेवण्यास हरकत नाही, पण संपूर्ण टाळेबंदीच्या मन:स्थितीत ...

Enforcement / reaction to strict restrictions | कठोर निर्बंधांची अंमलबजावणी/ प्रतिक्रिया

कठोर निर्बंधांची अंमलबजावणी/ प्रतिक्रिया

googlenewsNext

- वीरेन शहा, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन

...................................

शनिवार, रविवारी दुकान बंद ठेवण्यास हरकत नाही, पण संपूर्ण टाळेबंदीच्या मन:स्थितीत सलून व्यावसायिक नाहीत. मागच्या वर्षभरात आम्ही आर्थिकदृष्ट्या कंगाल झालो आहोत. त्यामुळे नवा लॉकडाऊन परवडणारा नाही. इतर दुकानांप्रमाणे सलून सायंकाळपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. सर्व नियम पाळून संसर्गाची साखळी तोडण्यास आम्ही सहकार्य करू.

- प्रकाश चव्हाण, सलून असोसिएशन

....................

५० टक्के क्षमतेने जिम सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून व्यायामशाळेचे भाडे, कामगारांचे वेतन, इतर देयके यांसाठी आर्थिक अडचणी जाणवणार नाहीत. कोरोना रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची आम्ही हमी देतो. मुख्यमंत्री आमच्या मागणीची दखल घेतील, अशी खात्री आहे. प्रत्येक नियमावलीचे पालन करून आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करू.

- महेश गायकवाड, महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशन

.........................

कोरोनाचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. असे असले तरी कोरोनास्थिती हाताबाहेर जात असल्याने काही निर्बंधांची गरज आहे. प्रत्नेयेक नागरिका काटेकोरपणे नियम पाळण्याची आवश्यकता आहे. निर्बंधांचे उचित पालन झाल्यास जलदरीत्या कोरोना आटोक्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात येईल.

- के. बी. कचरू, हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया

..................

पहिल्या लॉकडाऊनमुळे आधीच आमचे कंबरडे मोडले. आता दुसऱ्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिक पूर्णतः नेस्तनाभूत होतील. एकीकडे २५० चौ.मी. आकाराच्या बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्याकडे डोळेझाक केली जाते. पण, ६-७ हजार चौ.मी. आकाराच्या सभागृहात लग्नसमारंभ आयोजित करण्यावर आक्षेप घेतला जातो, हा दुजाभाव आहे. लग्नसोहळ्यास ५० जणांची मर्यादित उपस्थिती व्यावसायिक दृष्टीने परवडणारी नाही. ही मर्यादा किमान २०० पर्यंत वाढवावी. कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी याआधी करीत होतोच, यानंतरही करू.

- संजय पवार, लग्नसमारंभ व्यवस्थापक, भांडुप

.........................

पालकांच्या मागणीनुसार कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्या सुरू केल्या. पण, लगेच दुसरा लॉकडाऊन लागला. उरलेला अभ्यासक्रम पूर्ण करून सराव परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करीत आहोत. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी खबरदारी घेत आहोत.

- हरेश साळस्कर, खासगी शिकवणीचालक, कुर्ला

......................

चित्रपटगृहांना लॉकडाऊनमधून सूट मिळणे अवघड दिसते. त्यामुळे आम्ही थिएटर बंद ठेवले आहे. कामगारांनाही न येण्याचे आवाहन केले आहे. काही कामगार गावाला निघून गेले आहेत. कोरोनाने आर्थिक आणि मानसिक नुकसान केले आहे.

- श्रीकांत कांबळे, भारत चित्रपटगृह, कुर्ला

.............................

सरकारी निर्बंधांबाबत माहिती मिळाली. परंतु, दुकान बंद ठेवून परवडण्यासारखे नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे पालन करून दुकान सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी; अन्यथा हातावर पोट असलेले आमच्यासारखे व्यावसायिक कोलमडून पडतील.

- दीपक यादव, पानपट्टी व्यावसायिक, घाटकोपर

......................

ब्युटी पार्लरमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचे एकही उदाहरण नाही. सर्वतोपरी काळजी घेऊन कोरोनाकाळात सेवा दिली. आता नव्या नियमावलीनुसार पूर्ण महिनाभर दुकान बंद ठेवावे लागल्यास उपासमारीची वेळ ओढवेल.

- सुनीता सरोदे, ब्युटी पार्लर मालक, कुर्ला

....................

मागच्या लॉकडाऊनमध्ये गावी गेलो होतो. पण, तिकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्यामुळे परत मुंबई गाठली. नुकताच व्यवसाय सुरू झाला होता. पण, पुन्हा लॉकडाऊन लागू केल्यामुळे दुकान बंद करावे लागणार आहे. घरोघरी जाऊन कपडे गोळा करण्यासही काही गृहनिर्माण संस्था विरोध करतात. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा, हा यक्षप्रश्न समोर आहे.

- रामजतन यादव, लॉण्ड्री व्यावसायिक, चांदिवली

Web Title: Enforcement / reaction to strict restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.