Join us

कठोर निर्बंधांची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर निर्बंधाची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून करण्यात येणार होती पण सकाळपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर निर्बंधाची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून करण्यात येणार होती पण सकाळपासून रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. नेहमीच्या तुलनेत रस्त्यावरील २० टक्के वाहनांमध्ये घट झाली असे वाहतूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी झालेली पहायला मिळाली. सध्या रस्त्यावर जी वाहनांची गर्दी होते. त्याच्या तुलनेत २० टक्के वाहने कमी होती अशी माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिली. कठोर नियमावलीमुळे अनेकजण घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत होता. दादर, वरळी,एलबीएस मार्ग,ईस्टर्न एक्स्प्रेस वे , वेस्टर्न एक्स्प्रेस वे, फ्री वे ,लालबाग उड्डाणपूल, बीकेसी या भागात वाहनांची वर्दळ कमी झाली आहे.

एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने एसटी वाहतूक बंद आहे. मुंबईत एसटीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. काही निवडक गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावली नुसार एसटीतून आसन क्षमतेइतकी प्रवासी वाहतुकीची मुभा आहे, उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही.

मुंबईत कामावर येणाऱ्यांची संख्या कमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारपासून कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सोमवारी दररोजच्या तुलनेत वाहनांची गर्दी कमी झाली आहे. मुंबईत कामासाठी येणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

रिक्षाच्या २५ तर टॅक्सीच्या ४० टक्के प्रवाशांमध्ये घट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावली नुसार रिक्षाने २ तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. लोक घराबाहेर पडत नसल्याने रिक्षाचे प्रवासी २५ आणि टॅक्सीचे ४० टक्क्यांनी कमी झाले असे स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले. तसेच मंगळवारी प्रवाशांच्या संख्येवर ५० टक्के परिणाम होईल असेही ते म्हणाले.

माल वाहतुकीवरही परिणाम

कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर माल वाहतुकीसाठी कामगारांची कमतरता आहे. अनेक कंपन्यांनी माल भरला नाही. त्यामुळे सोमवारी ३५ ते ४० टक्के गाड्या उभ्या होत्या. तसेच भाजीपाला वाहतूकही २५ टक्क्यांनी घटली आहे.

राजेंद्र वनवे, अध्यक्ष जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशन