दुरंतो एक्सप्रेसचे इंजिन फेल, लोकल खोळंब्याने डोंबिवलीत गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 09:20 AM2019-06-19T09:20:03+5:302019-06-19T09:20:26+5:30
दुरंतो एक्सप्रेसला पहाटे 6 वाजून 5 मिनिटांनी इंजिनाची समस्या निर्माण झाली
मुंबई : नेरळजवळ दुरंतो एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. या बिघाडामुळे लोकल बदलापूरपर्यंतच धावत आहेत. तर वाहतुकीस 25 मिनिटे विलंब होत असून डोंबिवली स्थानकात चाकरमान्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे.
दुरंतो एक्सप्रेसला पहाटे 6 वाजून 5 मिनिटांनी इंजिनाची समस्या निर्माण झाली, त्यानंतर आता कर्जत येथून दुसरे इंजिन पाठवले असून ते अपलोड करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कर्जत स्थानक मास्तर दालनातून सांगण्यात आली आहे. मात्र, अगदी सकाळीच इंजिनमध्ये हा बिघाड झाल्याने मार्गावरील लोकल रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. तर लोकलच्या वेळात बदल झाल्याने कार्यालयीन वेळेत ऑफिससाठी निघालेल्या चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. एकूणच डोंबिवलीसह इतरही लोकल स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.