मुंबई - राज ठाकरे महाआघाडीत आल्यास फायदाच होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बोलून दाखवले आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांसोबतही आघाडीची सकारात्मक चर्चा सुरू असल्याच भुजबळ यांनी म्हटलंय. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या युतीला टक्कर देण्यासाठी महाआघाडीचं मोठं प्लॅनिंग होत असल्याचं दिसून येत आहे.
शिवसेना कितीही नकार देत असली तरी शेवटी भाजपासोबत जाणारच, असा अंदाज आणि तर्क सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून लावला जात आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शिवसेनेला भाजपासोबत जाण्याशिवाय पर्याच नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी सेना-भाजपा युती झाल्याचे लक्षात घेऊनच काँग्रेस-राष्ट्रवादीकडून निवडणुकांची रणनिती आखण्यात येत आहे. त्यातच, भुजबळ यांनीही राज ठाकरेंचे महाआघाडीत स्वागत असल्याचंच सुचवलंय. त्यामुळे आगामी काळात मनसेचं इंजिन घडाळाच्या काट्यावर धावल्यास आश्चर्य वाटता कामा नये.
राष्ट्रवादीच्या 'घड्याळा'ला मनसेचे 'काटे'?; राज ठाकरेंचा पवारांकडे 'या' तीन जागांचा प्रस्ताव
गेले अनेक दिवस स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेनं आता भाजपाला युतीच्या प्रस्तावासाठी 15 दिवसांची मुदत दिली असतानाच, तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रस्ताव दिल्याची सुत्रांची माहिती आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील एकेक जागा दिल्यास मनसेचं 'इंजिन' राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला जोडण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे तयार असल्याची माहिती 'लोकमत'कडे असल्याचे वृत्त मंगळवारी लोकमतने प्रकाशित केलं होतं. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे महायुतीत आल्यास फायदा होईल, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. त्यामुळे लोकमतचे वृत्त येणाऱ्या काळात राजकारणाची नवीन समीकरणं जोडतील हे नक्की. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याचं चित्र अलीकडच्या काळात अनेकदा दिसलं होतं. मग ती पवारांची महामुलाखत असेल, एकत्र केलेला विमान प्रवास असेल किंवा या दोघांमध्ये बंद दाराआड झालेलं गुफ्तगू. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड 'कृष्णकुंज'वर गेले होते, तेव्हा तर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 'कुछ तो गडबड है...' अशी चर्चाही रंगली होती. ती अगदीच उथळ नव्हती, असे संकेत आता मिळताहेत.