सायबर पोलिसांची कारवाई; १५०हून अधिक बनावट संकेतस्थळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नामांकित कंपनीची डिलरशीप देणे, कर्ज देणाऱ्या संस्था, डेटा एंट्री वर्क याबाबतचे बनावट संकेतस्थळ तयार करून फसवणूक करणाऱ्या अभियंत्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सोनू कुमार उर्फ राजेश चौधरी (२७) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने आतापर्यंत १५०हून अधिक बनावट संकेतस्थळे तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरीने तक्रारदार यांच्या सीईएटी कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून त्याद्वारे नागरिकांना डीलरशीप देण्याचे आमिष दाखवून गेल्यावर्षी नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान फसवणूक केली. याप्रकरणी ८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासात आरोपी हा बिहारच्या दरभंगा भागात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार सायबर पोलिसांनी बिहार येथून त्याला अटक केली. चौधरी हा उच्चशिक्षित असून, त्याने बी. टेक.चे संगणकीय प्रशिक्षण तसेच एम. टेक.चे प्रथम वर्षाचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने सीईएटीसह एकूण १५ कंपन्यांची बनावट संकेतस्थळे तयार केल्याची माहिती चौकशीत समोर आली. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, चाैधरीकडून दोन मोबाईल, एक लॅपटॉप, एक टॅब, एक हार्डडिस्क जप्त करण्यात आली. चौधरीने १५०पेक्षा अधिक बनावट संकेतस्थळांची कोडिंग केली असून, वेगवगेळ्या बनावट वेबसाईट तयार करून त्या होस्ट करण्याची तयारी केल्याचे तपासात समाेर आले आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक चाैकशी सुरू आहे.
..........................