मुंबई: कोल्हापूर पुण्यात इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. २०१३ पासून आलेल्या बेरोजगारीने तरुणाने थेट बनावट कागदपत्रांद्वारे विविध बँक, फायनान्स कंपन्यातून वाहन कर्ज घेत फसवणुकीचा धंदा सुरू केल्याची धक्कादायक बाब मरीनड्राईव्ह पोलिसांच्या कारवाईतून समोर आला आहे. सचिन मल्लीकार्जुन विल्लुर (४८) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २३ वाहने जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, आणखीन तीन महागड्या वाहनांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नॉन बँकिंग फायनाशियल कंपनीचे सेक्रेटरी आहेत. त्यांचे कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर हे बाजारातील दुचाकी वाहन विक्रेते यांच्याशी संपर्कात राहतात. सेल्स एक्झिक्युटिव्ह हे ग्राहक कर्ज परत फेडीबाबत तपासणी करतात. त्यानंतर ग्राहकाचे कस्टमर लीन अॅग्रीमेंट भरुन त्यावर स्वाक्षऱ्या घेऊन आवश्यक कागदपत्रे कंपनीकडे पाठवले जातात. त्यानुसार कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम तक्रारदार कंपनीकडून जमा केली जाते. हे व्यवहार झाल्यानंतर वाहन विक्रेते डिलरकडून त्या ग्राहकाला त्याने केलेल्या मागणीप्रमाणे वाहन देतात. त्या दरम्यान डिलरकडून कागदपत्रे संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठवून पुढील प्रक्रिया पार पडते.
सचिनने त्याचा उच्च शिक्षणाचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रांद्वारे विविध बँक, फायनान्स कंपनीना टार्गेट करण्यास सुरुवात केली. बनावट वाहन कर्जाच्या आधारे वाहन खरेदी केल्यानंतर, ते वाहन तो परस्पर अन्य ग्राहकांना विकत होता. सचिन हा नवी मुंबईत राहायचा. कर्जाचे हफ्ते न भरल्याने सबंधित बँक कर्मचारी त्याने दिलेल्या पत्त्यावर जायचे मात्र तो भेटत नव्हता. ना वाहन त्यांना मिळत होते. अखेर, त्यांनी पोलिसांत धाव घेवून तक्रार दिली.
त्यानुसार, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनखाली मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल, तपास अधिकारी गोंडुराम बांगल (गुन्हे), राकेश शिंदे अंमलदार सतिश सांगळे, नंदु कराटे, रामेश्वर लोंढे, कृष्णा सांगळे या पथकाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
त्याच्याकडून ८९ लाख किंमतीचे १६ दुचाकीसह ७ कार जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने मर्सिडीजही खरेदी केली. मात्र, त्यावर जीपीएस सिस्टीम असल्याने त्या वाहनाचा शोध घेण्यास फायनान्स कंपनीला यश आले आहे. मर्सिडीज सह आणखीन तीन वाहने लवकरच जप्त करण्यात येणार आहे.
कुणालाही कागदपत्रे देताना काळजी घ्या...
कुणालाही आपले वैयक्तिक कागदपत्रे देताना काळजी घेणे गरजेचे आहे. अशाप्रकारे ठग मंडळी तुमच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करू शकतात. तसेच, आरोपीला अटक करत अधिक तपास सुरू आहे. डॉ. प्रवीण मुंडे, पोलीस उपायुक्त