Join us

क्वारंटाइनमधून प्रवाशांना सूट देऊन पैसे उकळणारा अभियंता निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:09 AM

सहार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल : तिघांना अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून पैसे ...

सहार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल : तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना संस्थात्मक अलगीकरणातून अवैधरीत्या सूट देणाऱ्या दुय्यम अभियंत्याला पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी महापालिकेने तीन संशयितांविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्याची तातडीने चौकशी करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) दिनेश गावंडे हा विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना चुकीच्या व अवैध पद्धतीने संस्थात्मक विलगीकरणातून सूट देत होता. त्याला अन्य दोन जण मदत करीत असल्याची बाब केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) यांनी रात्रपाळीवर असलेल्या सत्रप्रमुख, महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता वकार जावेद हफिझ यांच्या निदर्शनास आणून दिली.

सीआयएसएफच्या मदतीने हफीझ यांनी झडती घेऊन त्याच्याकडून बनावट शिक्के व रक्कम जप्त केली. यामध्ये अन्य आस्थापनांचे दोघे संशयित म्हणून आढळले. गावंडे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या चुकीच्या कामकाजाबाबत घटनास्थळी पंचनामा करून, साक्षी नोंदवून प्राथमिक अहवाल हा महापालिकेचे उपआयुक्त (भूसंपादन) तथा विमानतळ उपाययोजनांचे प्रमुख अनिल वानखेडे यांना सुपुर्द करण्यात आला. त्यानुसार प्रशासनाने गावंडे यास निलंबित केले. तसेच या प्रकरणाची तातडीने सखाेल चौकशी सुरू केली आहे.

......................................