बारावीनंतरचे अभियांत्रिकी पदविका प्रवेश 100% पूर्ण, तंत्रशिक्षण संचालनालयाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 06:07 AM2021-01-22T06:07:16+5:302021-01-22T06:07:22+5:30
इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम नेमका काय आहे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही शाळांपर्यंत पोहोचून विशेष उपक्रम हाती घेतल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. वाघ यांनी सांगितले. शिक्षकांना यामध्ये नेमक्या काय सुविधा आहेत, याची माहिती करून दिली. विद्यार्थ्यांना आभासी टूर घडविल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई : अकरावी आणि आयटीआय प्रवेशामध्ये कमालीची घट दिसत असताना अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मात्र गेल्या वर्षीपेक्षा २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश, तर १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.
इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम नेमका काय आहे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही शाळांपर्यंत पोहोचून विशेष उपक्रम हाती घेतल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. वाघ यांनी सांगितले. शिक्षकांना यामध्ये नेमक्या काय सुविधा आहेत, याची माहिती करून दिली. विद्यार्थ्यांना आभासी टूर घडविल्याचेही त्यांनी सांगितले.
या विशेष उपक्रमात राज्यातील सर्व तंत्रनिकेतनचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली. तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि विभागाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनीही विशेष मार्गदर्शन केल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. यामुळेच प्रवेश वाढले असून येत्या काळात तंत्रनिकेतन अधिक सक्षम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सध्या उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली आहे. त्यासाठीच्या समितीवर औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधीच नियुक्त केले आहेत. न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी व कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक अभ्यासक्रम सुरू केल्याने ते विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत असल्याची प्रतिक्रिया वाघ यांनी दिली.