अचानक पावसाने इंजिनीअरिंगचे स्वप्न व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:42 AM2023-12-01T10:42:06+5:302023-12-01T10:42:55+5:30

इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहणारा सईलची गेल्या २० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज.

engineering dream on ventilator with sudden rain in mumbai | अचानक पावसाने इंजिनीअरिंगचे स्वप्न व्हेंटिलेटरवर

अचानक पावसाने इंजिनीअरिंगचे स्वप्न व्हेंटिलेटरवर

मुंबई : लोकल आर्म विभागात कार्यरत असलेले हवालदार राजू जाधव हे सध्या त्यांचा २५ वर्षांचा मुलगा सईल याच्या उपचारासाठी ६ लाख रुपये गोळा व्हावेत म्हणून धडपडत आहेत. मुंबईत ९ नोव्हेंबर रोजी अचानक आलेल्या पावसाने झालेल्या निसरड्या रस्त्यावर स्कुटीसह घसरून त्याचा भीषण अपघात झाला आणि इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहणारा सईल गेल्या २० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे.

अंधेरी पूर्वमधील मरोळच्या लोकल आर्मस विभागात जाधव कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा ९ नोव्हेंबर रोजी त्याच्या आजीसाठी औषध खरेदी करायला निघाला आणि अचानक पाऊस सुरू झाला. हेल्मेट घातलेला सईल निसरड्या रस्त्यावर आला, ज्यामुळे त्याची स्कुटी घसरली आणि दुभाजकावर आदळली. या अपघातात त्याच्या मेंदू, फुफ्फुस आणि मज्जातंतूला दुखापत झाली. त्याच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये विविध शस्त्रक्रिया आणि उपचार होऊनही १४ दिवसांत हा खर्च १९ लाख रुपयांवर पोहोचला. जाधव यांनी सुरुवातीला दीड लाख रुपये भरले. तर त्यांचे सहकारी, बॅचमेट आणि निवृत्त पोलिस अधिकारी यांच्या योगदानाने ९.५० लाख रुपये जमा झाले आहेत. 


नानावटी हॉस्पिटल येथील वैद्यकीय बिलांची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त ६ लाख रुपयांची गरज आहे ज्यासाठी ते एनजीओ, तसेच फंड जमा करणाऱ्या साइट्सवर मदत मागत आहेत.

ग्रीन सिग्नलमार्फत फोर्टिसमध्ये!

जाधव यांच्या मुलाला मुंबई पोलिसांनी आणीबाणीच्या ग्रीन सिग्नलअंतर्गत वाहतूक थांबवून नानावटी रुग्णालयामधून फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवले, जे मोठे आव्हान होते. हे करण्यापूर्वी त्यांनी नानावटी रुग्णालयात एक ६ लाख रुपयांचा पोस्टडेटेड चेक भरला होता.

पोलिस योजनेला वयाची मर्यादा!

दुर्दैवाची  गोष्ट म्हणजे सईल याचे वय २५ वर्षे आणि ८ महिने आहे. पोलिस योजनेअंतर्गत मिळणारे लाभ हे २५ वर्षांपर्यंत असल्याने या पात्रतेच्या निकषात तो बसत नाही.

कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत अविवाहित आणि २५ वर्षे वय असलेल्या पोलिसांच्या मुलांना मदत मिळू शकते. मात्र, जाधव यांच्या मुलाचे वय पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसल्याने ही स्पेशल केस म्हणून ग्राह्य धरावी, यासाठी मी शासनाशी पत्रव्यवहार करीत आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, यासाठी प्रयत्न करीत आहे.     - एस.जयकुमार, सहपोलिस आयुक्त, प्रशासन

Web Title: engineering dream on ventilator with sudden rain in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई