लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेच्या पहिल्या वर्षाच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत होती. त्याप्रमाणे, आता मुंबई विद्यापीठ प्रशासनाने या वेळापत्रकात बदल केला असून, ही परीक्षा ४ जुलै २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठाने इंजिनीअरिंग शाखेच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतल्या. त्या परीक्षेचा निकाल एप्रिल महिन्यात जाहीर होणे अपेक्षित होते; मात्र या निकालाला जवळपास सव्वा महिना उशीर झाला. शिवाय, त्याचवेळेस विद्यापीठ प्रशासनाने प्रथम सत्राच्या पुरवणी परीक्षा द्वितीय सत्रासोबत घेण्याचे जाहीर केले होते. परिणामी, पूर्वीच्या या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास कमी वेळ मिळत होता; तसेच मुलांच्या प्रथम वर्षाच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही याचा परिणाम झाला असता, अशी भावना पालकवर्गाकडून व्यक्त होत होती.
१४ जूनला होणार होती परीक्षा
मुंबई विद्यापीठ प्रशासनाने पालकांकडून सातत्याने होणाऱ्या या मागणीची दखल घेत इंजिनीअरिंग शाखेच्या पहिल्या वर्षाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १४ जून रोजी होणाऱ्या या परीक्षा आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली आहे.