अभियांत्रिकीची परीक्षा जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:24 AM2019-03-07T05:24:47+5:302019-03-07T05:24:59+5:30
अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना दोन पेपरदरम्यान तीन ते चार दिवसांच्या सुट्टीऐवजी एकच सुट्टी देण्याचा विचार मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेकडून प्रस्तावित होता.
मुंबई : अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना दोन पेपरदरम्यान तीन ते चार दिवसांच्या सुट्टीऐवजी एकच सुट्टी देण्याचा विचार मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेकडून प्रस्तावित होता. मात्र या प्रस्तावाच्या संदर्भात विविध सूचना विद्यापीठास प्राप्त झाल्या. त्यानुसार प्रस्तावित वेळापत्रक २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांसाठी लागू न करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यामुळे यंदाच्या परीक्षा जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच होतील. मात्र, पुढील शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० पासून हा प्रस्ताव लागू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे.
अभियांत्रिकी शाखेच्या चार वर्षांच्या पदवीमध्ये आठ सत्रांच्या परीक्षा असल्यामुळे तसेच प्रत्येक पेपरनंतर किमान तीन ते चार दिवसांची सुट्टी दिली जात असल्याने परीक्षेचा कालावधी १ महिन्यापेक्षा अधिक असतो. त्यामुळे निकालासही विलंब होतो. यासाठी या परीक्षेचा कालावधी कमी करण्याचा तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमानुसार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देणे गरजेचे असल्यामुळे अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदलाचा प्रस्ताव विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठात्यांनी, अभियांत्रिकी शाखेच्या प्राचार्यांच्या बैठकीत मांडला होता. या प्रस्तावानुसार अभियांत्रिकी शाखेच्या सत्रनिहाय परीक्षेतील एका पेपरनंतर दुसऱ्या पेपरमध्ये फक्त एक दिवसाची सुट्टी देण्याचे प्रस्तावित होते. यामुळे परीक्षा लवकर संपून निकाल वेळेत जाहीर करता येईल असा विद्यापीठाचा मानस होता.
विद्यार्थ्यांना एआयसीटीईच्या नियमांप्रमाणे इंटर्नशिपसाठी वेळ मिळावा यासाठी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश उकरांडे यांनी महाविद्यालयीन प्राचार्यांच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेसाठी मांडल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक विनोद पाटील यांनी सांगितले. मात्र औपचारिकरीत्या याची अंमलबजावणी न झाल्याने नियोजन पुढील शैक्षणिक सत्रापासून करण्याची मागणी युवासेनेने विनोद पाटील यांना निवेदन देऊन केली होती. ती मान्य झाली आहे.
>वेळापत्रक लवकरच होणार जाहीर
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या८ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून परीक्षा कालावधी या शैक्षणिक वर्षासाठी पूर्वीप्रमाणेच कायम राहील. विद्यार्थ्यांना दोन विषयांच्या पेपरमध्ये याआधीप्रमाणेच अभ्यासासाठी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यानुसारच मुंबई विद्यापीठ प्रथम सत्र २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेचे वेळापत्रक जुन्या पद्धतीने लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले.