मुंबई विद्यापीठात गिरवता येणार मराठीतून अभियांत्रिकीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:13+5:302021-06-30T04:06:13+5:30

स्कूल संकल्पनेसह विविध शैक्षणिक उपक्रमांना विद्या परिषदेमत मंजुरी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : क्षेत्रीय भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याच्या ...

Engineering lessons in Marathi can be taken at Mumbai University | मुंबई विद्यापीठात गिरवता येणार मराठीतून अभियांत्रिकीचे धडे

मुंबई विद्यापीठात गिरवता येणार मराठीतून अभियांत्रिकीचे धडे

Next

स्कूल संकल्पनेसह विविध शैक्षणिक उपक्रमांना विद्या परिषदेमत मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : क्षेत्रीय भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याच्या एआयसीटीईच्या शिफारशीला मंगळवारी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये लवकरच मराठी भाषेमध्ये अभियांत्रिकेचे धडे गिरवता येतील. याशिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखांतर्गत अभियांत्रिकीच्या शिक्षणात आमूलाग्र बदल घडून येणार आहेत.

औद्योगिक गरजा लक्षात घेऊन अभियांत्रिकीच्या आठ शाखांमध्ये उदयोन्मुख नवीन विषयांच्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (डेटा सायन्स), कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स अँड मशीन लर्निंग), कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्ल्युडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी), अशा अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठात मंगळवारी विद्या परिषदेची बैठक पार पडली. यामध्ये विद्यापीठाच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षापासून विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात होत आहे. विद्यापीठ पातळीवर विविध विषयांना एका छताखाली आणण्यासाठी स्कूल संकल्पना राबवली जाणार आहे. विविध विद्याशाखांतर्गत असलेल्या विषयांची ओळख आणि ते विषय शिकण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकेल. याअंतर्गत स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस, स्कूल ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस आणि स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌, अशा विविध स्कूल्सची स्थापना करण्यासाठी विद्या परिषदेमध्ये मंजुरी देण्यात आली.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांचा राष्ट्रसेवेमध्ये सहभाग वाढावा यासाठी आजमितीस ज्या- ज्या महाविद्यालयात एनसीसी युनिट आहे. त्या- त्या महाविद्यालयात एनसीसी हा वैकल्पिक विषय म्हणून सुरू करण्यासाठीही मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे ६८ महाविद्यालयांत एनसीसी युनिटस्‌ आहेत. याशिवाय मुंबई विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या सागरी अध्ययन केंद्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन केंद्र या दोन्ही नवीन केंद्रांच्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. भौतिकशास्त्र विभागाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘व्हर्च्युअल सेंटर ऑफ एक्सलेन्स इन थेरॉटिकल अँड कम्प्युटेशनल फिजिक्स’ या केंद्राच्या स्थापनेसही मंजुरी मिळाली आहे.

* कौशल्यवाढीसाठी विशेष प्रयत्न

विद्यार्थ्यांमधील कौशल्यवाढीसाठी आणि विशेष क्षेत्रात प्रावीण्य संपादित करण्यासाठी विद्यापीठात पहिल्यांदाच संशोधनात्मक क्षेत्रीय केस स्टडीजचा समावेश करण्यात येणार आहे. वाणिज्य विद्याशाखेंतर्गत बीएमएस, बीएएफ आणि बीबीआई या अभ्यासक्रमांच्या चौथ्या सत्रात क्षेत्रीय केस स्टडीज सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ३० तास आणि २ क्रेडिट बहाल केले जाणार आहेत, तसेच विज्ञान शाखेंतर्गत वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांसाठी आणि मानव्यविद्याशाखांतर्गत अर्थशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र विषयांसाठीही क्षेत्रीय केस स्टडीज सुरू करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात १२ जून २०२२ पासून होणार आहे.

Web Title: Engineering lessons in Marathi can be taken at Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.