‘पीएच.डी.’त अभियांत्रिकी, विज्ञान शाखा आघाडीवर, पदवी-पदव्युत्तरमध्ये कला शाखेचे विद्यार्थी अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:40 AM2024-01-29T10:40:32+5:302024-01-29T10:41:05+5:30
Education News: भारतात पदवी-पदव्युत्तर स्तरावरील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेचे विद्यार्थी अधिक असले तरी ‘पीएच.डी.’त अभियांत्रिकी-तंत्रज्ञान आणि विज्ञान शाखांनी कला शाखेला मागे टाकले आहे.
मुंबई - भारतात पदवी-पदव्युत्तर स्तरावरील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेचे विद्यार्थी अधिक असले तरी ‘पीएच.डी.’त अभियांत्रिकी-तंत्रज्ञान आणि विज्ञान शाखांनी कला शाखेला मागे टाकले आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने २०२१-२२चा ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन (एआयएसएचई) नुकताच प्रसिद्ध केला. या अहवालानुसार २०२१-२२ या वर्षात एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ७८.९ टक्के विद्यार्थी पदवीपूर्व तर १२.१ टक्के पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण घेत होते. यात पदवी स्तरावर कला शाखेत (३४.२ टक्के) शिकणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर विज्ञान (१४.८ टक्के), वाणिज्य (१३.३ टक्के) आणि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (११.८ टक्के) या शाखांमध्ये सर्वाधिक नावनोंदणी झाली आहे. पदव्युत्तर स्तरावरही सामाजिक शास्त्रांमध्ये (२१.१ टक्के) विद्यार्थी नोंदणी अधिक आहे. त्यानंतर विज्ञान (१४.७ टक्के) शाखेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
विशेष म्हणजे पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांमध्ये कला शाखेचे विद्यार्थी अधिक असले तरी पीएच.डी. करणाऱ्यांमध्ये अभियांत्रिकी-
तंत्रज्ञान (२४.८ टक्के) आणि विज्ञान (२१.३ टक्के) शाखेतील विद्यार्थी आघाडीवर आहेत.
पीएच.डी. प्रवेश सात वर्षांत दुप्पट
सात वर्षांत पीएच.डी.ला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या सुमारे दुप्पट झाली आहे. २०१४-१५ मध्ये १.१७ विद्यार्थी पीएच.डी. करत होते. २०२१-२२मध्ये यात ८१.२ टक्के इतकी वाढ झाली असून, एकूण नोंदणी २.१२ लाखांवर गेली आहे. मुलींचे पीएच.डी. करण्याचे प्रमाणही सात वर्षांत दुप्पट (४८ लाखांवरून ९९ लाख) झाले आहे.