इंजिनीअरिंग : दुसऱ्या फेरीच्या प्रवेशाचा निकाल जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:45 PM2024-08-27T12:45:14+5:302024-08-27T12:45:38+5:30
१९ हजार २८ विद्यार्थी अद्यापही कॉलेज मिळण्याच्या प्रतीक्षेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीत १ लाख ४२ हजार ५४४ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्यात आले असून, १९ हजार २८ विद्यार्थी अद्यापही प्रवेशासाठी कॉलेज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
राज्यात यंदा इंजिनीअरिंगसाठी १ लाख ६१ हजार ५७२ जागा उपलब्ध आहेत. त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा १ लाख ९२ हजार ३९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील पहिल्या फेरीत १,७६,१११ विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी अर्ज भरून कॉलेजचे पसंती क्रमांक नोंदविले होते.
पहिल्या फेरीत यातील १,२६,४५८ विद्यार्थ्यांना कॉलेजांतील जागांचे वाटप करण्यात आले होते. यातील २८ हजार ७०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
दरम्यान, या जागांवरील प्रवेशासाठी सीईटी सेलने २० ते २२ ऑगस्टदरम्यान दुसरी कॅप फेरी घेतली. या फेरीतील कॉलेजांमधील जागांचे वाटप सीईटी सेलने सोमवारी जाहीर केले. या फेरीसाठी तब्बल १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी अर्ज भरून पसंती क्रमांक सादर केले होते. त्यातील १ लाख ४२ हजार ५४४ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्यात आले आहे, तर १९ हजार २८ विद्यार्थ्यांना कोणतेही कॉलेज मिळू शकले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यंदा ३ लाख ७९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीएम ग्रुपची सीईटी परीक्षा दिली होती, तर गेल्यावर्षी इंजिनीअरिंगसाठी एक लाख ५९ हजार ३१७ जागा उपलब्ध होत्या. त्यामध्ये गेल्यावर्षी १ लाख १७ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतले होते, तर ४१ हजार ३७९ जागा रिक्त राहिल्या होत्या. इंजिनीअरिंगच्या कॅप फेऱ्यांसाठी गेल्यावर्षीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातून यंदा जागा भरल्या जातील, अशी आशा व्यक्त होत आहे.