Engineers' Day: उदयोन्मुख इंजिनिअरचं देशवासीयांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 03:51 PM2018-09-15T15:51:53+5:302018-09-15T16:14:12+5:30
तुमच्यात कौशल्य असेल तर इंजिनिअरिंग क्षेत्राच्या नौकेत बसून आपण आपल्या यशाचा मार्ग नक्कीच गाठू शकतो यात शंका नाही.
मुंबई - स्वदेस सारखा शाहरुख खानचा सिनेमा पाहिला की आपणही आपल्या देशासाठी काहीतरी घडवू शकतो असे वाटायला लागतं. ती प्रेरणा, ऊर्जा आणि मार्ग दिसतो इंजिनिअरिंगमध्ये. आपण इंजिनिअरिंग सारख्या उत्तम क्षेत्रात करिअर घडवत आहोत याचा अभिमानही वाटू लागतो. आज इंजिनिअरिंग क्षेत्राकडे कल कमी नाही पण या क्षेत्रातील नोकरीच्या संधी कमी असा गाजावाजा होताना दिसतो. खरं तर आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आणि विज्ञानाचे आहे. ज्यामध्ये तुमच्यात कौशल्य असेल तर इंजिनिअरिंग क्षेत्राच्या नौकेत बसून आपण आपल्या यशाचा मार्ग नक्कीच गाठू शकतो यात शंका नाही.
एक विद्यार्थी म्हणून आज या क्षेत्राकडे का वळलास असे अनेक प्रश्न माझ्यापुढे अनेकदा उभे राहतात. मध्यंतरीच्या काळात या क्षेत्राकडे कमी झालेला विद्यार्थ्यांचा कल आणि झटपट नोकरीची हमी यामुळे या क्षेत्रावर आज अनेक प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. मात्र तुमच्यात कौशल्य आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर या क्षेत्रातील यशासोबत आपण आपल्या देशाची प्रगती ही साध्य करू शकतो. या क्षेत्रात होणारी प्राध्यापक, विद्यार्थी यांची प्रश्नोत्तरांची जुगलबंदी फक्त अभ्यासात नाही तर आयुष्यात ही उपयोगी पडते. टेक्निकल नॉलेजसोबत पर्सनल डेव्हल्पमेंटसाठी स्पेस यातून तयार होत असते.
भारतात लाखोने इंजिनियर बनतात आणि यशस्वी झाल्याची ही उदाहरणं आहेत. आता आपल्या सुंदर पिचाईलाच बघा, एक भारताचा इंजिनियर बाहेरगावी जाऊन गूगलचा 'सी.ई.ओ" बनतो. आपले लाडके "डॉ. ए पी जे अब्दुल कलाम" यांनी केलेलं 'स्पेस रिसर्च' आपण आजही जोपासतो. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक हा केबल स्टे ब्रीज आहे. ब्रिजच्या वजनाचं संपूर्ण टेन्शन केबल्सनं घेतलंय, म्हणून या ब्रिजला केबल स्टे ब्रिज म्हणतात. वांद्रे ते वरळी या प्रवासाला एरव्ही तीस ते चाळीस मिनिटं लागायची. पण या पुलामुळे हे अंतर फक्त १० ते १५ मिनिटांत पार करता येते. चायना व जापान च्या इंजिनिअर्सने हा ब्रिज अशक्य म्हणून सांगितले होते मात्र भारतीय इंजिनिअर्सने ते करून दाखवले.
मात्र अलीकडे इंजिनिअर्सला ‘अच्छे दिन’ नाहीत, नोकऱ्या दुरापास्त झाल्यात. इंजिनिअरिंगचे शिक्षण नोकऱ्या मिळविण्याइतकं दर्जेदार नाही वगैरे बोललं जातं, तसे अहवालही अधूनमधून येत असतात. परिणामी, सोशल मीडियावर ‘इंजिनिअर्स डे’ साजरा होत असतानाही या बिकट परिस्थितीचं प्रतिबिंब उमटतंच, कारुण्यमय विनोद होतात. मात्र खरंच भारत असो किंवा इतर कुठलाही देश जगाच्या पाठीवर इंजिनिअरची जागा कोणतेही इतर क्षेत्र घेऊ शकत नाही. आकाशात उडणारे विमान, जमिनीवर धावणाऱ्या इलेक्रीकल बसेस, पाण्यातून चालणारी मोठाली जहाजे साऱ्यात इंजिनिअरिंग आहे हे मेनी करावेच लागेल. त्यामुळे माझ्या मित्रांना आपण इंजिनिअर आहोत याचा अभिमान बाळगायला सांगेन कारण शेवटी इंजिनिअर्स आर द इंजिन ऑफ वर्ल्ड... !
- सिद्धेश देसाई, बी. इ , लास्ट इअर , व्हिवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग