Join us

भरती प्रक्रिया रद्द होऊनही अभियंत्यांची परीक्षा : स्थायी समिती विरुद्ध प्रशासन वाद रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 4:24 AM

कनिष्ठ अभियंत्यांच्या ३४१ पदांसाठीच्या आॅनलाइन भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यास प्रशासनाने नकार दिल्यामुळे स्थायी समितीने याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी दप्तरी दाखल केला होता. ही भरती प्रक्रिया स्थायी समितीने रद्द ठरविल्यानंतरही अभियंत्यांची परीक्षा पूर्वनियोजित वेळेनुसार सोमवारी घेण्यात आली.

मुंबई - कनिष्ठ अभियंत्यांच्या ३४१ पदांसाठीच्या आॅनलाइन भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यास प्रशासनाने नकार दिल्यामुळे स्थायी समितीने याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी दप्तरी दाखल केला होता. ही भरती प्रक्रिया स्थायी समितीने रद्द ठरविल्यानंतरही अभियंत्यांची परीक्षा पूर्वनियोजित वेळेनुसार सोमवारी घेण्यात आली. स्थायी समितीच्या निर्णयाला डावलून परीक्षा घेण्यात आल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा वाद पेटणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात स्थायी समितीची पूर्वमंजुरी न घेता पालिका प्रशासनाने कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया राबवली. ३४१ कनिष्ठ अभियंत्यांची ही पदे सरळसेवा भरतीतून भरण्यात येणार होती. मात्र आचारसंहितेत भरती प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे अनेक उमेदवारांना यात भाग घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेची मुदत १५ दिवसांनी वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी स्थायी समितीच्या मागच्या बैठकीत केली होती. मात्र कनिष्ठ अभियंत्यांची पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने पूर्वनियोजित दिवशी आॅनलाइन परीक्षा घेण्यात येईल, असे पालिकेच्या नगर अभियंता विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे संतप्त स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ भरती प्रकिया रद्द करण्याची मागणी केली.विरोधी पक्षांमध्ये नाराजीचा सूरराष्ट्रवादी गटनेत्या राखी जाधव यांच्या या उपसूचनेला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे ही भरती प्रक्रिया सर्वानुमते रद्द करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. त्यामुळे ही परीक्षा होणार का? याबाबत अभियंत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र नियोजित वेळेनुसार ही परीक्षा पवई, आयआयटी येथे पार पडली. या भरतीचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. स्थायी समितीने भरती प्रक्रिया रद्द केल्यानंतरही प्रशासनाने परीक्षा घेतल्यामुळे विरोधी पक्षामध्ये नाराजी आहे. या परीक्षेची कोणतीही माहिती नगरसेवकांना देण्यात आलेली नाही. ही स्थायी समितीच्या अधिकारावरच गदा असल्याने याबाबत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई