महापालिकेचे अभियंते आता निवडणुकीच्या कामात; प्रकल्पस्थळी अभियंत्यांची चणचण जाणवण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:59 AM2024-02-16T09:59:03+5:302024-02-16T10:00:30+5:30
मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त झाल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडलेल्या मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांसाठी हा दिलासा क्षणिकच ठरला आहे.
मुंबई : मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त झाल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडलेल्या मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांसाठी हा दिलासा क्षणिकच ठरला आहे. या अभियंत्यांना आता निवडणुकीचे काम करावे लागणार आहे. याआधी अभियंते आणि आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांना अशा कामांसाठी घेतले जात नव्हते. सध्या पालिकेचे अनेक प्रकल्प सुरू असून अनेक अभियंते हे या प्रकल्पांशी निगडित आहेत. त्यामुळे या अभियंत्यांचे काम अन्य अभियंत्यांना करावे लागणार आहे. त्यामुळे प्रकल्पस्थळी अभियंत्यांची चणचण जाणवण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या कामासाठी शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेकडे २५ हजार मनुष्यबळाची मागणी केली आहे.
या कार्यालयाकडून पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांना, सर्व विभाग प्रमुखांना आणि खाते प्रमुखांना पत्र पाठवून कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीच्या कामासाठी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. विकासकामे कंत्राटदारामार्फत केली जात असली तरी त्यावर देखरेख ठेवण्याचे काम अभियंते करत असतात. साहजिकच देखरेख ठेवण्यासाठी मनुष्यबळ कमी पडू शकते.
नवमतदार नोंदणीसाठी सहकार्य :
नवमतदार नोंदणीसाठी सध्या विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी पालिकेची मदत घेतली जाणार आहे. आरोग्य सेविका, आशा सेविका , बचत गट, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान आणि नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून नवमतदार नोंदणी मोहिमेत पालिका सहकार्य करणार आहे.
निवडणुकीच्या कामासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. अभियंते हे तांत्रिक कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना या कामातून वगळायला हवे. पालिका आयुक्तांनी निवडणूक आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून निवडणुकीच्या कामासाठी अभियंत्यांना घेऊ नये. मागील निवडणुकीच्या तुलनेत पालिकेच्या पाच पट जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीच्या कामासाठी केली आहे.
- साईनाथ राजाध्यक्ष, कार्याध्यक्ष, बृहन्मुंबई मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन