इंग्रजी माध्यमांचा ‘डिमांड’ वाढला
By admin | Published: January 12, 2015 10:15 PM2015-01-12T22:15:53+5:302015-01-12T22:15:53+5:30
शहर आणि सिडको वसाहतीतील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा डिमांड वाढत चालला आहे. नर्सरीकरिता अर्ज घेण्याकरिता पालकांच्या रांगाच्या रांगा शाळेबाहेर लागलेल्या दिसत आहेत.
पनवेल : शहर आणि सिडको वसाहतीतील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा डिमांड वाढत चालला आहे. नर्सरीकरिता अर्ज घेण्याकरिता पालकांच्या रांगाच्या रांगा शाळेबाहेर लागलेल्या दिसत आहेत.
गेल्या काही वर्षात पनवेल परिसरात अनेक संस्थांनी सिडकोकडून सवलतीच्या दरात भूखंड घेऊन शैक्षणिक संकुले थाटली. काही खाजगी संस्थांनी आपला शैक्षणिक दर्जा चांगला ठेवण्याकडे भर दिला. त्याकरिता चांगले उपक्रम, उत्कृष्ट शिक्षकांची फौज, शालेय पोषक वातावरण याकडे लक्ष देऊन या शाळांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे या खाजगी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढू लागला
आहे. नवीन पनवेलमध्ये डीएव्ही, सेंट जोसेफ, न्यू हॅरिजन, कळंबोलीतील कारमेल, रेयान, खारघर विश्वज्योत, संजीवनी, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा ओढा अधिक आहे.
शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरु होत असले तरी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार या शाळांच्या बाहेर अर्ज खरेदी करण्याकरिता पालकांच्या रांगाच रांगा दिसू लागल्या आहेत.
अर्ज मिळणार नाही, या भीतीने कळंबोलीतील कारमेलमध्ये तर पहाटे चार वाजल्यापासून रांगा लावल्या जात आहेत. त्याचबरोबर नवीन पनवेल येथील डीएव्ही पब्लिक स्कूलसमोर पालकांनी रांगेत उभे राहून अर्ज घेतले.