Join us  

ट्रॅफिक पोलिसांसाठी इंग्रजीचे धडे

By admin | Published: June 17, 2014 1:29 AM

यामध्ये एका सामाजिक संस्थेमार्फत वाहतूक पोलिसांची इंग्लिश स्पीकिंगची बॅच भरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

पंकज रोडेकर, ठाणेवाहतुकीचे नियम धाब्यांवर बसवणाऱ्या वाहनचालकांकडून शासकीय नियमानुसार दंड आकारणाऱ्या वाहतूक पोलिसांना एखाद्या वेळी कोणी स्मार्ट इंग्रजी बोलणारा भेटल्यावर त्यांचे मनोधैैर्य खचू नये तसेच पंचाईत होेऊ नये, यासाठी लवकरच ठाणे शहर पोलीस आगळावेगळा उपक्रम हाती घेणार आहेत. यामध्ये एका सामाजिक संस्थेमार्फत वाहतूक पोलिसांची इंग्लिश स्पीकिंगची बॅच भरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आयुक्तालयाच्या क्षेत्रात वाहतूक नियंत्रण शाखेचे एकूण १६ युनिट आहेत. त्याद्वारे ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरात कारवाई केली जाते. मुंबई, गुजरात आदी भागात जाणारी जड-अवजड वाहनेही ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातूून ये-जा करतात. दिवसेंदिवस वाढत्या वाहनांच्या संख्यामुळेच वाहतूककोंडी होते. याचदरम्यान, वाहतुकीचे नियम वारंवार धाब्यावर बसविणाऱ्यांची संख्या वाढल्याने शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध योजना हाती घेत दंडामध्येही काही प्रमाणात वाढ केली आहे. वाहतूक नियमवलीनुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची एकूण ४३ प्रकारांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. त्यातही मुख्यत: भन्नाट वेगाने गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, जादा भाडे आकारणे, एकदिशा मार्गातून गाडी चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, लाइटविना गाडी हाकणे, मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग करणे, विनापरवाना गाडी चालविणे आदींचा समावेश आहे. हे नियम धाब्यांवर बसवणाऱ्यांवर कारवाई केली जाते. या वेळी एखादा स्मार्ट इंग्लिश बोलणारा कोणी भेटल्यास वाहतूक पोलिसांची त...त...प... प... होते. ही पंचाईत होऊ नये म्हणून त्यांना इंग्रजीचे धडे देण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेतीलच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.