मलेशियाच्या धर्तीवर 'ट्री वॉक', मुंबईतील उद्यानात चालण्याचा आनंद मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 11:51 PM2021-12-27T23:51:47+5:302021-12-27T23:56:13+5:30

मलबार हिल येथे कमला नेहरु पार्कचे विशेष आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. त्याचबरोबर आता या उद्यानात पशु-पक्ष्यांचे मुक्त विहार न्याहाळता यावे, यासाठी निसर्ग उन्नत मार्ग म्हणजेच ट्री वॉक तयार करण्यात येणार आहे

Enjoy the Tree Walk in the style of Malaysia, the elevated nature trail in the park in Mumbai | मलेशियाच्या धर्तीवर 'ट्री वॉक', मुंबईतील उद्यानात चालण्याचा आनंद मिळणार

मलेशियाच्या धर्तीवर 'ट्री वॉक', मुंबईतील उद्यानात चालण्याचा आनंद मिळणार

Next
ठळक मुद्देकोणत्याही प्रकारची वृक्षतोड न करता व वन्यजीवांची हानी न करता याठिकाणी फेरफटका मारण्यासाठी ट्री वॉक बांधण्यात येणार आहे. या कामासाठी ३०० चौरस मीटर एवढी मोठ्या प्रमाणात साल लाकडाची गरज आहे.

मुंबई - मलबार हिल येथील प्रसिद्ध कमला नेहरू उद्यानाच्या पायथ्याशी ट्री वॉक उभारण्यात येणार आहे. मलेशियाच्या धर्तीवर हा अनोखा निसर्ग उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. मात्र यासाठी पुढे आलेल्या मलेशियन कंपनीने चक्क पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा पाच कोटी ७७ लाख रुपये अधिकची बोली लावली आहे. 

मलबार हिल येथे कमला नेहरु पार्कचे विशेष आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. त्याचबरोबर आता या उद्यानात पशु-पक्ष्यांचे मुक्त विहार न्याहाळता यावे, यासाठी निसर्ग उन्नत मार्ग म्हणजेच ट्री वॉक तयार करण्यात येणार आहे. यासाठी १२ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक महापालिकेने तयार केले होते. मात्र यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेमध्ये केवळ एकमेव कंपनीने भाग घेतला. या कंपनीचा प्रस्ताव जलअभियंता विभागाने मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे. विशेष म्हणजे या कंपनीने ४९.९५ अधिक दराने निविदा भरल्या होत्या. मात्र महापालिकेने वाटाघाटी केल्यानंतर ३९.९६ एवढा दर त्यांनी लावला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च १८ कोटी ४४ लाख रुपयांवर पोहोचणार आहे.

कोणत्याही प्रकारची वृक्षतोड न करता व वन्यजीवांची हानी न करता याठिकाणी फेरफटका मारण्यासाठी ट्री वॉक बांधण्यात येणार आहे. या कामासाठी ३०० चौरस मीटर एवढी मोठ्या प्रमाणात साल लाकडाची गरज आहे. हे लाकूड भारतात उपलब्ध न झाल्यास परदेशातून मागवले जाणार आहे. तसेच अपेक्षित आकारांमध्ये हे लाकूड उपलब्ध होण्यासाठी कारखान्यातून कापून आणले जाणार आहे. या कामांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये एच.एम.व्ही. असोसिएशन ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने लेजंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत संयुक्त भागीदारीत हे काम मिळवले आहे. मलेशियातील केपांग, सेलानगोर, वनसंशोधन संस्था येथे पर्यावरण पर्यटन सुविधेचे अर्थात कॅनॉपी-पायवाट २ व निसर्ग उन्नत मार्ग या कंपनीने बनवला आहे. 

यासाठी अंदाजपत्रकापेक्षा अधिक खर्च... 

या कामांसाठी यांत्रिकीऐवजी मनुष्यबळाचाच अधिक वापर केला जाणार आहे. प्रत्येक खांबांच्या ठिकाणी काँक्रिटचे पंपिंग करण्यास अडचण येण्याची शक्यता आहे. तसेच साल लाकूड उपलब्ध करणे आणि कापून देणे, डोंगर भाग असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, शांतता क्षेत्र असल्याने कामगारांची राहण्याची व्यवस्था अन्य ठिकाणी करणे, प्रत्येक वस्तूंच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि दोष दायित्व काळात विदयुत कामे व लाकडांची दुरुस्ती यामुळे पालिकेचे अंदाजपत्रक १२ कोटींचे असले तरी खर्च मात्र १८ कोटी ४४ लाखांवर पोहोचणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. 
 

Web Title: Enjoy the Tree Walk in the style of Malaysia, the elevated nature trail in the park in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.