लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : येथील ओव्हल मैदान, राज्यातील इतर मैदानांत येणाऱ्या महिला खेळाडू; तसेच मुंबई शहरात कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलावर्गासाठी स्वच्छतागृहांची पुरेशी उपलब्धता करण्याच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश लोकायुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली.
मुंबईतील ओव्हल मैदान; तसेच राज्यातील इतर मैदाने; तसेच मुंबईत कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याच्या वृत्ताची लोकायुक्तांनी दखल घेतली आहे. त्यानुसार आता या प्रकरणी सूचना करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देशही दिले होते. आता त्या निर्देशानुसार ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) या समितीचे अध्यक्ष असतील.
सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, महिला व बालविकास, शालेय शिक्षण व क्रीडा या विभागांचे प्रधान सचिव या समितीवर असतील. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले अतिरिक्त महापालिका आयुक्त दर्जाचे अधिकारी देखील या समितीवर असतील. ही समिती स्वच्छतागृहांच्या बाबत सूचना करेल व मार्गदर्शन करेल. पुढील सहा महिन्यांत या एसआयटीचा अहवाल सरकारला सादर करेल. यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी काढण्यात आला.
३३ समाजसेवी संस्थांनी उठवला आवाज
- महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे असली पाहिजेत, यासाठी मुंबईत विविध संघटनांनी आवाज उठविला आहे. कोरो आणि अन्य ३३ समाजसेवी संस्था त्या उद्देशाने कार्य करत आहेत.
- राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर महिलांसाठी अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे नाहीत, याबाबतही यापूर्वी अनेकदा आवाज उठविण्यात आला होता. महिलांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने त्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात.