मुंबई : जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहरामबाग येथील रामनगर ते क्रांतीनगर जमातखाना परिसरापर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. फेरीवाल्यांनी रस्ता आणि पदपथ हा पूर्णपणे व्यापून टाकला आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या भेडसावत आहे. रस्त्याच्या जवळच ओशिवरा पोलीसठाणे अंतर्गत बीट क्रमांक-३ असूनदेखील पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. बेहरामबाग, रामनगरपासून ते क्रांतीनगर जमातखानादरम्यान संपूर्णपणे रस्त्याच्या दोन्ही दिशेच्या पदपथांवर आणि पदपथांलगत असलेल्या रस्त्यावर बेकायदेशीर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच बेहरामबाग बीट क्रमांक ३समोर नवजीवन मेडिकलसमोरील रस्त्याच्या वळणावर शेअर रिक्षामुळे सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला, शाळेतील मुलांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. तसेच चालत्या वाहनांमधून वाट काढतदेखील चालावे लागते. ओशिवरा पोलीस ठाणे अंतर्गत असणाºया बीट क्रमांक ३समोरील भागात बेकायदेशीर रिक्षाचालक कुठेही वाहने पार्क करतात, त्यामुळे रस्ता अडविला जातो. रिक्षाचालक गणवेशाशिवाय रिक्षा चालवतात. एकाच वेळी रिक्षात ५ ते ६ प्रवासी बसवले जातात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे ओशिवरा पोलीस ठाण्यात थेट प्रक्षेपण होत असते. परंतु, पोलीस प्रशासन आणि महापालिका का दुर्लक्ष करत आहे, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.दरम्यान, अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येबाबत के/ पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि स्थानिक नगरसेविका रंजना पाटील यांच्याशी फोन आणि संदेशद्वारे संपर्क केला असता कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.>रस्त्यावर आणि पदपथांवर फेरीवाल्यांचे साम्राज्य असल्याने प्रवाशांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. सद्य:स्थितीमध्ये प्रवाशांना चालायला रस्ताच नाही. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात. त्यामुळे परिसरात गर्दी, वाहतूककोंडी याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर प्रचंड वाहतूक असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरू लागले आहे. संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार केले असून, त्वरित प्रवाशांसाठी पदपथ मोकळे करावेत.- संतोष सोनवणे, अध्यक्ष,जनजागृती मानवकल्याण प्रतिष्ठान
रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण, रामनगर ते क्रांतीनगर जमातखानादरम्यान पदपथावर कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:23 AM