लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लहानग्यांच्या लसीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयातील लस चाचणीला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, सर्व स्तरांवर जनजागृती झाल्यानंतर आता नायर रुग्णालयातील लहानग्यांच्या लस चाचणीला प्रतिसाद मिळाल्याचे दिलासादायक चित्र आहे. नायर रुग्णालयात सध्या २ ते ११ वयोगटातील लाभार्थ्यांची लस चाचणी सुरू असून, यात १० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला आहे.
नायर रुग्णालयांचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, सध्या रुग्णालयात लस चाचणीविषयी चौकशी करण्यासाठी पालकांचा प्रतिसाद येत आहे. रुग्णालयात कोव्होव्हॅक्स लसीची चाचणी सुरू आहे. यापूर्वी, नायर रुग्णालयात झायडस कॅडिलाची झायकोव्ह डी या लसीची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता २ ते ११ या वयोगटासाठी लसीकरण ट्रायल घेतली जात आहे. दरम्यान, या वयोगटासाठी देशभरातील दहा केंद्रांवर २३० लहान मुलांची गरज आहे. शिवाय, लस किंवा प्लासिबो घेतल्यानंतर डॉक्टरांना सहा महिने पाठपुरावा करावा लागणार आहे. केवळ आरोग्यासंबंधित कोणत्याही तक्रारी नसलेल्या सुदृढ मुलांवर आणि नवीन प्रतिपिंडे न बनलेल्या लहानग्यांना चाचणीत सहभागी केले जाते. चाचणीपूर्वी सर्व आरोग्य चाचण्या केल्या जातील. जर मुलगा किंवा मुलगी तपासाच्या मानदंडात पात्र सिद्ध झाले, तरच त्याला चाचणीमध्ये समाविष्ट केले जाईल.