मुंबई : भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान नेहमीच मानाचे राहिले आहे. कारण ते परिवाराचा आधारवड असतात. ज्येष्ठांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात सुरक्षित, आरोग्य सुविधायुक्त वातावरण देण्यासाठी शासन कायम त्यांच्या पाठीशी आहे. मुंबई शहरात महिनाभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चर्चासत्र कार्यक्रमाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केसरकर बोलत होते.दीपक केसरकर म्हणाले, न्यूयॉर्क येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र केंद्र चालवली जातात. त्याच धर्तीवर मुंबईत अशी केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यांना ने - आण करण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येईल. या केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार दिवस घालवता येईल. शाळांमध्ये आजी - आजोबा दिवस हा उपक्रम आपण सुरू केला. यानिमित्त राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास सवलत सुरू केली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली आहे.८० वर्ष वयाच्या आजी - आजोबांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय काम करत असलेल्या फेस्कॉम, हेल्पेज इंडीया, जनसेवा फाऊंडेशन या संस्थांचाही सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमास आमदार सदा सरवणकर, आमदार देवराव होळी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सहसचिव दि. रा. डिंगळे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. गिरीश राजाध्यक्ष यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य व राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष निर्मला सामंत प्रभावळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदे या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केले तर आभार समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मानले. कार्यक्रमास प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहायक आयुक्त प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त समाधान इंगळे, सहायक आयुक्त सुनील जाधव उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र - दीपक केसरकर
By सचिन लुंगसे | Published: October 05, 2023 5:09 PM